300 रुग्णांना काढावे लागले बाहेर
वृत्तसंस्था/ मंडी
हिमाचल प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान दोन रुग्णालयांना बॉम्बची धमकी मिळाली. मंडी जिल्ह्यातील श्री लालबहादुर शास्त्राr मेडिकल कॉलेज तसेच रुग्णालय आणि चंबा मेडिकल कॉलेजला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी ईमेलद्वारे प्राप्त झाल्यावर प्रशासनाने खबरदारीदाखल पूर्ण परिसर रिकामी करविला.
नेरचौक येथील मेडिकल कॉलेजची ओपीडी बंद करण्यात आली, तसेच वर्गही स्थगित करण्यात आले. मेडिकल कॉलेजच्या प्राचार्याना पहाटे 3.30 वाजता ईमेल प्राप्त झाला होता. हा ईमेल तामिळनाडूतून पाठविण्यात आल्याची बाब समोर आली आहे. धमकी मिळाल्यावर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना खबरदारीदाखल बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दल तसेच बॉम्बविरोधी पथकाने मेडिकल कॉलेजमध्ये जात तपासणी केली असता काहीच संशयास्पद आढळून आलेले नाही. शोधमोहीम पूर्ण झाल्यावरच रुग्णांना रुग्णालयात आत नेण्यात आले.









