वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांना बाँबची धमकी आल्यानंतर आता हॉटेल ताज पॅलेस आणि टू मॅक्स रुग्णालयालाही बाँब स्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या इमारतीची आणि परिसराची कसून तपासणी करण्यात आली. हा प्रकार शनिवारी घडला. तथापि, बाँबसदृश कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे ही धमकी बनावट होती हे स्पष्ट झाले. तरीही राजधानी दिल्लीत सावधानतेचा इशारा देण्यात आला असून भारतातील इतर महत्वाच्या शहरांमधील पोलीस यंत्रणेलाही सावध करण्यात आले आहे. समाजकंटकांचा लोकांमध्ये घबराट उडविण्याचा हेतू असू शकतो. तथापि, अशा धमक्या गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांच्या संदर्भातील धमक्यांची गंभीर नोंद सर्वोच्च न्यायालयानेही घेतली असून ही उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव यांच्याकडून अहवाल मागविला आहे.









