तपासाअंती बनावट असल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानी दिल्लीतील चार शाळांना शुक्रवारी सकाळी पुन्हा बॉम्बच्या धमक्यांचे ई-मेल आले. या धमकीनंतर प्रशासनाने तात्काळ शाळा रिकामी करत सखोल तपास व चौकशी केली. शहरातील चार वेगवेगळ्या शाळांना बॉम्बच्या धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले होते, मात्र तपासात ही धमकी खोटी असल्याचे सिद्ध झाल्याचे दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अग्निशमन दलाची अनेक पथके, स्थानिक पोलीस, बॉम्ब निकामी करणारी पथके आणि श्वान पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. सर्व ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. आता धमकीचे ई-मेल कोठून पाठवले गेले आणि त्यामागे कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, बॉम्बच्या धमकीबाबतचा पहिला कॉल सकाळी 8:15 वाजता द्वारका सेक्टर 16 मधील शाळेला प्राप्त झाला. त्यानंतर सकाळी 8:20 वाजता नांगलोई येथील संत दर्शन पब्लिक स्कूलमधून दुसरा कॉल आला. गोयला डेअरी परिसरातील शांती ज्ञान निकेतन येथून सकाळी 8:51 वाजता असाच एक फोन आला आणि प्रसाद नगरमधील आंध्रा स्कूलमधून सकाळी 10:33 वाजता चौथा फोन आल्याचे सांगण्यात आले.









