प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या हलसूर तलावनजीकच्या गुरुद्वाराला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चार दिवसांपूर्वी राज गिरी या नावाने ई-मेल आला होता. या प्रकरणी हलसूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरडीएक्सचा स्फोट घडविण्यात येईल. गुरुद्वाराच्या स्वच्छतागृहात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा उल्लेख धमकीच्या संदेशात करण्यात आला आहे. ऋषिपाल सिंग यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास हाती घेतला आहे.
बेंगळूरमध्ये अलीकडे बॉम्बस्फोटाच्या धमकीचे सातत्याने संदेश येत आहेत. सहा दिवसांपूर्वी बेंगळूरमधील दिवाणी न्यायालयाला देखील बॉम्बच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. हलसूर गेट पोलीस आणि श्वान पथकाने न्यायालयाच्या परिसराची तपासणी केल्यानंतर बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. 27 जुलै रोजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे कार्यालय आणि केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली होती. महिनाभरापूर्वी बेंगळूर शहरातील 40 शाळांनाही अशा धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. त्यामुळे घबराट निर्माण झाली होती.









