तपासणीत काहीच आढळले नाही संशयास्पद
वृत्तसंस्था/ वडोदरा
गुजरातमध्ये वडोदराच्या नवरचना इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. शाळेत जात श्वानपथकाने शोध घेतला परंतु काहीच संशयास्पद हाती लागले नाही. भयाली भागात नवरचना इंटरनॅशनल स्कूलच्या तीन शाखा असल्याने तिन्ही ठिकाणी शोध घेण्यात आला. शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. परंतु तपासानंतर धमकी अफवा ठरली आहे.
भयाली येथील नवरचना इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकांना ईमेलद्वारे शाळेच्या पाइपलाइनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाली होती. बॉम्बविरोधी पथक, श्वानपथक आणि स्थानिक पोलिसांनी शाळेत जात कसून तपासणी केली. तेथे काहीच संशयास्पद हाती लागले नाही. आता संबंधित ईमेल कुणी पाठविला होता याचा तपास सायबर टीम करत असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त जी.बी. बंभानिया यांनी सांगितले आहे. धमकी मिळाल्यावर संस्थेच्या तीन शाळांना शुक्रवारी सुटी जाहीर करण्यात आली होती. शाळेच्या ड्रेनेज लाइनमध्ये टायमरयुक्त बॉम्ब ठेवण्यात आल्याचे ईमेलमध्ये नमूद होते.









