वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानातील एका क्रू मेंबरला शुक्रवारी सकाळी एक धमकीचे पत्र मिळाले. या पत्रात विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. सदर पत्रात विमान क्रमांकाची नोंद असल्याने तातडीने सदर विमानाची तपासणी करण्यात आली. विमानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बॉम्बची तपासणी करण्यात आली. मात्र, कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यानंतर, ही केवळ धमकी असल्याचे घोषित करण्यात आले. गेल्या काही आठवड्यात एअर इंडियाच्या विमानांमध्ये अनेक तांत्रिक आणि ऑपरेशनल समस्या आढळून आल्या आहेत. यामुळे एअर इंडियाच्या विमानांच्या सुरक्षिततेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. अनेक उ•ाणे रद्द करण्यात आली आहेत. यातच ही धमकी प्राप्त झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.









