30 हजार डॉलर्सची मागणी करणारा ई-मेल प्राप्त : श्वान-बॉम्बशोधक पथकांकडून तपासणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील 40 शाळांना सोमवारी सकाळी पुन्हा बॉम्बची धमकी मिळाली. आरके पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूल आणि पश्चिम विहारमधील जीडी गोएंका पब्लिक स्कूलसह इतर शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या ई-मेलमधून 30 हजार डॉलर्सची मागणी करण्यात आली आहे. धमकीच्या ई-मेलनंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना घरी पाठवले. तसेच पोलिसांनाही यासंबंधी कळवण्यात आले. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दिल्ली अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. तपास यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शाळा परिसरात शोधमोहीम राबविली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.
बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर दिल्ली पोलिसांच्या पथकाकडून शाळांची तपासणी करण्यात आली. दिल्लीतील 40 हून अधिक शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचे सांगण्यात आले. सदर ई-मेलमध्ये शाळेच्या इमारतींमध्ये अनेक बॉम्ब पेरल्याचे नमूद करण्यात आले आहे. बॉम्ब लहान असून ते लपवून ठेवल्यामुळे इमारतीचे फारसे नुकसान होणार नाही, मात्र बॉम्बचा स्फोट झाल्यास अनेक जण जखमी होतील, असा इशारा देण्यात आला होता. या प्रकरणावरून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केंद्र सरकारच्या परिस्थिती हाताळण्यावर टीका केली आहे. तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.









