प्रतिनिधी/ बेंगळूर
विमानतळ आणि शाळांसह सार्वजनिक ठिकाणी बॉम्बच्या धमकीचे फोन आणि ई-मेल वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वीच कलबुर्गी विमानतळावर बॉम्बची धमकी देणारा ई-मेल आला होता. आता हुबळी विमानतळाच्या संचालकांना विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल पाठविण्यात आला आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून हुबळी विमानतळाचे संचालक ऊपेश कुमार यांना ई-मेलद्वारे धमकीचा संदेश पाठविण्यात आला आहे. ‘लाँग लीव्ह पॅलेस्टाईन’ या मेल आयडीवरून विमानतळाच्या संचालक कार्यालयाच्या मेल आयडीवर धमकीचा संदेश आला आहे. आम्ही तुम्हाला नष्ट करू. तुम्ही केलेल्या सर्व वाईट गोष्टींसाठी आमच्याजवळ उत्तर नाही, अशी समजूत करून घेऊ नका, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. ई-मेल संदेश प्राप्त होताच रुपेश कुमार यांनी ही बाब टर्मिनल प्रभारी प्रताप यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ही माहिती सीएएसओ, आयबी, बीडीडीएस आणि बॉम्ब निकामी पथकाला दिली. विमान वाहतूक सुरक्षा नियमांनुसार अधिकाऱ्यांनी सुरक्षाविषयक आवश्यक पावले उचलली. याप्रकरणी गोकुळ रोड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.