पुणे / वार्ताहर :
दादर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्यास पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
योगेश शिवाजी ढेरे (वय 35, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत प्रकाश सुतार यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश ढेरे याने 16 जुलैला त्याच्या मोबाईलवरून पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. दादर जंक्शन रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची धमकी त्याने पोलिसांना दिली. या फोनमुळे पोलिसांची धांदल उडाली. नागरिकांमध्येही भीती पसरली. मात्र, ही अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी ढेरे याला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 182, 505 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सात ते आठ वर्षांपूर्वी आरोपी योगेश याचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती अस्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस खैरनार करत आहेत.









