वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली. बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच पोलीस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) कर्मचाऱ्यांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने विमानतळावर कसून शोधमोहीम सुरू केली. मात्र, तपासाअंती कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने सुटकेचा नि:श्वास टाकण्यात आला. यापूर्वी शनिवारी येथील विविध हॉटेल्सना बॉम्बस्फोटाच्या धमक्या पाठवण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विमानतळावर स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली.
विमानतळ प्रशासनाला सकाळी एक ई-मेल मिळाला होता. या संदेशात विमानतळावर बॉम्ब ठेवण्याची आणि स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. यासंबंधी सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांना तात्काळ माहिती दिल्यानंतर दोघांनीही बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने विमानतळावर कसून शोध घेतला. आता सायबर पोलीस सदर धमकी पाठविणाऱ्याचा मूळ स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहे.









