ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट घडवणार असल्याचा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला आहे. आज सकाळी 10 वाजता कॉलरने हा फोन केला आहे. या फोनमुळे पोलीस प्रशासन खळबळून जागं झालं आहे.
फोनवरुन बोलणाऱ्या कॉलरने 24 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट होणार आहे. आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे, ही रक्कम मिळाल्यानंतर मी हे बॉम्बस्फोट थांबवू शकतो. तसेच पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्फोट मी स्वत: घडवून आणणार आहे. त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. दोन लाख रुपये मिळाल्यास मी आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावा कॉलरने केला आहे.
दरम्यान, पोलीस तपासादरम्यान कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचे तपासात समोर आले आहे. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम 505(1)(बी), 505(2) आणि 185 अन्वये गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.