दोघे जखमी, दहशतवादी कृत्य असल्याचा दाट संशयः तपास एनआयएकडे सोपविणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
मंगळूरमध्ये शनिवारी सायंकाळी एका रिक्षामध्ये प्रेशर कुकरमध्ये बॉम्बचा स्फोट झाला असून यात चालक आणि एक प्रवासी जखमी झाला आहे. या स्फोटप्रकरणी पोलिसांच्या पथकाने म्हैसूरमधील दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नागुरीच्या कंकनाडी पोलीस स्थानकाजवळ रिक्षामध्ये झालेला स्फोट हा अपघात नसून ते दहशतवाद्यांचे कृत्य होते, असे डीजीपी प्रवीण सूद यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. सदर प्रकरण राज्य सरकारने गांभीर्याने घेतले असून याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, दिल्लीतील एनआयए पथकाने रविवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच सध्या तपासासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्फोट प्रकरणाबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध झाली असून हा अपघाती स्फोट नाही, हे एक घृणास्पद कृत्य आहे. स्फोटावेळी आजूबाजूला कोणीही नसल्याने मोठी हानी टळली असून याबाबत राज्य पोलीस खात्याकडून तपास सुरू केल्याचे प्रवीण सूद यांनी सांगितले.
म्हैसूरमध्ये दोन संशयित ताब्यात
मंगळुरातील स्फोटप्रकरणी पोलिसांच्या पथकाने म्हैसूरमधील दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याप्रकरणी मंगळूर आणि म्हैसूर पोलिसांनी म्हैसुरातील लोकनायक नगरमधील एका घरावर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांपैकी एकजण मंगळूरचा असल्याचे समजते. छाप्यावेळी पोलिसांनी अनेक साहित्य जप्त केले असून यात 10 मोबाईलचा समावेश आहे. सध्या त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
कुकरमध्ये टाईम बॉम्ब?
स्फोट झालेल्या रिक्षामध्ये कुकर सापडला असून त्यामध्ये बॅटरी, वायर, नट-बोल्ट, सर्किट आदी वस्तू आढळून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हा टाईमबॉम्ब असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. टायमर सेट करून बॉम्बचा स्फोट घडविण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, काही चुकांमुळे तो वाटेतच स्फोट झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
संशयिताची पटली ओळख
रिक्षातील कुकर स्फोटाच्या प्रकरणाचा तपास करणाऱया पोलिसांना संशयिताची ओळख पटली आहे. संशयिताने म्हैसूरच्या लोकनायक नगरमधील मोहनकुमार यांच्या इमारतीत एक खोली भाडय़ाने घेतली होती. भाडय़ाने घेतलेल्या खोलीच्या करारावर आपले नाव प्रेमराज असल्याचे नमूद केले होते. तसेच मूळ गाव आणि पत्ता हुबळीचा असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
खोलीत आढळली स्फोटके
संशयिताच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर पोलिसांना स्फोटासाठी वापरलेल्या अनेक वस्तू सापडल्या आहेत. सर्किट बोर्ड, लहान बोल्ट, बॅटरी, मोबाईल, लाकडाचा भुसा, ऍल्युमिनियम, मल्टीमीटर, वायर, मिक्सर जार, प्रेशर कुकर यासह अनेक वस्तू आढळून आल्या आहेत. याचबरोबर एक मोबाईल, दोन नकली आधारकार्ड, एक पॅनकार्ड, फिनो डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहे, असे सूत्रांकडून समजते.
रिक्षातील प्रवाशाचे नकली ओळखपत्र
घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर खासगी रुग्णालयातील आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. सदर व्यक्ती 45 टक्के भाजली आहे. त्याच्याजवळ सापडलेल्या आधारकार्डमध्ये हुबळीतील प्रेमराज यांचा पत्ता आहे. परंतु हे नकली आधारकार्ड असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने दिलेल्या जबानीनुसार पोलिसांचे पथक म्हैसूरमध्ये तपास करीत आहे.
गृह खात्याकडून गंभीर दखल
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या मंगळूर दौऱयाच्या पार्श्वभूमीवर हा स्फोट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. स्वातंत्र्यसैनिक केदंबाडी रामय्या गौडा यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी शनिवारी मुख्यमंत्री बोम्माई मंगळूर दौऱयावर आले होते. राज्याच्या गृह खात्याने या स्फोटाची गंभीर दखल घेतली आहे. बेंगळूरहून बॉम्ब तपास तज्ञांचे आणखी एक पथक घटनास्थळी दाखल होणार आहे.