सत्तापालटाच्या प्रयत्नाप्रकरणी दोषी : निर्णयावर भडकले डोनाल्ड ट्रम्प
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या एका समितीने माजी अध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांना 2022 साली निवडणुकीतील पराभवानंतरही पदावर कायम राहण्यासाठी सत्तापालटाच्या प्रयत्नाप्रकरणी दोषी ठरविले आहे. तसेच समितीने 27 वर्षे आणि तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. बोल्सोनारो हे सध्या घरात नजरकैद आहेत. या निर्णयाच्या विरोधात ते दाद मागू शकतात, याप्रकरणी सुनावणी करणाऱ्या 5 न्यायाधीशांपैकी चार जणांनी बोल्सोनारो यांना 5 आरोपांमध्ये दोषी मानले आहे.
सत्तापालटाच्या प्रयत्नाप्रकरणी दोषी ठरलेले बोल्सोनारो हे ब्राझीलचे पहिले माजी अध्यक्ष ठरले आहेत. या निर्णयाबद्दल मी अत्यंत असंतुष्ट आहे. हा निर्णय ब्राझीलसाठी अत्यंत वाईट असल्याची टिप्पणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. या निर्णयानंतर बोल्सोनारो यांना त्वरित तुरुंगात पाठविले जाणार नाही. न्यायालयाची समिती आता या निर्णयाला सार्वजनिक करण्यासाठी कमाल 60 दिवसांचा कालावधी घेऊ शकते. यानंतर बोल्सोनारो यांच्या वकिलांना स्पष्टीकरणदाखल याचिकेसाठी 5 दिवसांची मुदत मिळणार आहे.
समर्थक उतरले रस्त्यांवर
ही शिक्षा ‘सर्वोच्च छळ’ आहे आणि जेयर बोल्सोनारो योग्य होते, हे इतिहासच सिद्ध करणार असल्याचा दावा त्यांचे ज्येष्ठ पुत्र सिनेटर फ्लावियो बोल्सोनारो यांनी केला आहे. तर या खटल्यामुळे ब्राझिलियन समाज दोन मतांमध्ये विभागला गेला आहे. काही लोक माजी अध्यक्षांच्या विरोधात सुरू असलेल्या या प्रक्रियेचे समर्थन करत आहेत. तर काही जण अद्याप बोल्सोनारो यांना साथ देत आहेत. अनेक लोक रस्त्यांवर उतरून या उजव्या विचारसरणीच्या नेत्याचे समर्थन करत आहेत.
माजी सैन्याधिकारी
बोल्सोनारो हे माजी सैन्याधिकारी असून त्यांनी 1964-85 दरम्यान शेकडो लोकांची हत्या करणाऱ्या सैन्य राजवटीबद्दल स्वत:ची प्रतिबद्धता दाखविली होती. बोल्सोनारो यांना जगभरातील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांकडून समर्थन मिळत असल्याचे चित्र आहे. आपण राजकीय छळाचे शिकार ठरलो असल्याचा दावा बोल्सोनारो करत आहेत.









