एकेकाळी अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड यांचे समीकरण होते. अंडरवर्ल्डने साम-दाम-दंड-भेद नितीचा अवलंब करायचा आणि
बॉलिवूडने अगदी तंतोतंत ते पाळायचे. त्यातून कोणी डोके वर काढायचा प्रयत्न केलाच, तर त्याचा अंडरवर्ल्डकडून ‘पोटला’ (हत्या) झालाच म्हणून समजायचा. त्यातच रॅपर सिंगर आणि राजकारणी सिद्धु मुसेवाला याची हत्या तसेच
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना जीवे मारण्याची धमकी. यामुळे बॉलिवूड पुन्हा गँगवॉरच्या दिशेने तर जात नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंजाबसह जगातील अनेक देशांत आपल्या
रॅपर पंजाबी गाण्याने भुरळ पाडणाऱया सुभाषसिंग बलकौरसिंग उर्फ सिद्धु मुसेवाला याची भरदिवसा अत्याधुनिक शस्त्राने गोळ्या झाडून हत्या केल्याने, देशात एकच खळबळ माजली आहे. सिद्धु मुसेवाला याची हत्या करण्यामागे नेमका हेतु काय होता ? हे अद्याप समजले नाही. सिद्धु मुसेवाला हा केवळ गायक नसून, तो राजकारणी देखील होता. नुकत्याच पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेच्या तिकीटावर उभा होता. मात्र आपच्या उमेदवाराकडून त्याचा पराभव झाला होता. या हल्याची जबाबदारी तिहार कारागृहात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई आणि पॅनडामध्ये स्थायिक असलेल्या गोल्डी ब्रार यांनी घेतली. सिद्धु मुसेवाला याच्या हत्येचा तपास सुरु असतानाच दुसरीकडे मुंबईत वेगळेच नाटय़ घडत होते. बॉलिवूडमध्ये दबंग अभिनेता अशी ओळख असलेल्या सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना ज़ीवे मारण्याची धमकी आल्याने, मुंबई पोलीस हादरुन गेली आहे.
बॉलिवूडमध्ये पुन्हा धमकीसत्र आणि गँगवॉर सुरु झाला की काय ? अशी शंका मुंबई पोलिसांना आली आहे. यामुळे सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी तत्काळ याप्रकरणाचा छडा लावण्यास सुरुवात केली आहे.
तर दुसरीकडे सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान याना धमकी देण्याची जबाबदारी देखील लॉरेन्स बिश्नोई याने घेतली आहे. तर पुणे पोलिसांनी गायक सिद्धु मुसेवाला याच्या हत्येप्रकरणात संशयीत म्हणून अटक केलेल्या सौरभ महाकाल याची मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या धमकीमागे बिश्नोई असल्याची कबुली त्याने दिली आहे. मात्र खरेच यामागे बिश्नोई गँग आहे की, बिश्नोई गँगच्या खांद्यावर बंदुक ठेवून अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय होत आहे ? हे आत्ताच सांगता येणार नाही. कारण बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचा संबंध फार जुना आहे. बॉलिवूडमध्ये अनेकदा गँगवॉर, हत्यासत्र, धमकी, खंडणी तसेच ब्लॅक मनी गुंतविल्याचे प्रकार समोर आले आहेत. मुंबईत अंडरवर्ल्ड चरणसीमावर असताना दाऊदने दुबईत बस्तान बसविले होते. दुबईत राहून तो मुंबईवर राज करीत होता. त्याची एवढी दहशत होती की, बॉलिवूडसुद्धा त्याच्या इशाऱयावर उघडपणे नाचत होते. 1992 च्या पूर्वी अनेक अभिनेतेदेखील दाऊदचा पाहुणचार घेण्यासाठी दुबईत जात होते. दाऊदला कोणतीही अभिनेत्री आवडली तर तो तिला तत्काळ दुबईला बोलावून घेत असे. यामध्ये मंदाकिनी या अभिनेत्रीचे नाव अनेकदा चर्चेत होते. कधी दाऊदचा तर कधी त्याचा भाऊ अनिसचा वाढदिवस तर कधी भावाचे लग्न यासाठी त्याने अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना दुबईत बोलावून घेतले होते. या सर्वांचे व्हिडीओ तसेच फोटो आजही क्राईम ब्रँचकडे आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दाऊदचा शब्द प्रमाण मानला जात होता. मिथून चक्रवर्ती, संजय दत्त, फिरोज खान, जॉनी लिवर, आदित्य पंचोली, अनिता अयुब, अनिल कपुर, असरानी, मजहर खान हे सर्व अभिनेते 1992 पूर्वी दाऊदच्या खूप जवळ होते. एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला चित्रपटात काम द्यायचे असेल तर दाऊदच्या एका फोनवर त्यांना काम मिळत होते. एवढी दहशत दाऊदची त्या काळी होती. जर दाऊदचे कोणी ऐकले नाही तर येणाऱया काही दिवसातच त्याचा ‘पोटला’ (हत्या) केला जायचा. यामुळे दाउदला कोणी नाही म्हणण्याची हिंमत करीत नसे. ज्याप्रमाणे, दाऊदची दहशत बॉलिवूडमध्ये होती, अगदी त्याचप्रकारची दहशत छोटा राजनने देखील करण्यास सुरुवात केली होती. याकरीता त्याने अनेक आघाडीच्या चित्रपट निर्मात्याना खंडणीसाठी धमकाविले होते.

त्याचप्रमाणे, गँगस्टर अबु सालेमने देखील
बॉलिवूडमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. एवढेच नाही तर बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमाविण्यासाठी आलेल्या मोनिका बेदीशी त्याने लग्न देखील केले होते. अंडरवर्ल्डच्या धमकीचे अनेक बळी बॉलिवूडमध्ये गेले आहेत. तर काहीनी बॉलिवूडमधील आपले स्पर्धक संपविण्यासाठी अनेकदा अंडरवर्ल्डची मदत देखील घेतली आहे. संगीतकार नदीम याच्या गाण्याच्या एकही पॅसेट बाजारात विकत नव्हत्या. त्यावेळी एकच नाव सुरु होते, ते म्हणजे पॅसेटकिंग गुलशन कुमार यांचे. गुलशन कुमारमुळे आपले अस्तित्व धोक्यात आहे, याची जाणीव झालेल्या नदीम याने अबु सालेमला गुलशन कुमारच्या हत्येची सुपारी ]िदली. त्यानुसार, अबु सालेमने 12 ऑगस्ट 1997 साली अंधेरी येथील चार बंगला परिसरात असणाऱया शिवमंदिरासमोर गुलशन कुमार यांची हत्या केली होती. या हत्येमुळे संपूर्ण बॉलिवूड जगत हादरुन गेले होते. तसेच छोटा शकिलने आर्थिक व्यवहारावरुन चित्रपट निर्माते मुकेश दुग्गल यांची हत्या केली होती.
अशा प्रकारचे अनेक हत्याकांड तसेच
गँगवॉरचे बळी हे बॉलिवूड ठरले आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या रवि पुजारीनेदेखील बॉलिवूड क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती. चित्रपट निर्माते महेश भट्ट याना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही तर महेश भट्ट यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या तब्बल 13 जणांना राकेश मारीया पोलीस आयुक्त असताना अटक करण्यात आली होती. वास्तविक पाहता, अशी अनेक उदाहरणे अथवा घटना आहेत, ज्यामध्ये बॉलिवूड अनेकदा अंडरवर्ल्डचे बळी पडले आहे. अगदी त्याचप्रमाणे, आताही तेच घडतेय की काय ? अशी शंका येण्यास सुरुवात झाली आहे. कारण सलमान खानला धमकी दिल्याची जबाबदारी भलेही लॉरेन्स बिश्नोई याने घेतली असेल, मात्र सध्या तो तिहार कारागृहात आहे. कारागृहात असताना कोणी गँगस्टर एवढी मोठी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेत असेल तर नक्कीच यामागे मोठी शक्ती असली पाहिजे. कारण सिद्धु मुसेवाला याच्यावर ज्या शस्त्राने हल्ला करण्यात आला ते शस्त्र रशियन बनावटीचे मेक एएन 94 असॉल्ट रायफल होते. ज्यामध्ये काडतुसांचा पट्टा ठेवल्यास ती एकाच वेळी 1 हजार 800 राउंड फायर करते. ही रायफल चालविण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण लागते. ही रायफल आपले लष्कर देखील वापरत नाही, तसेच रशियामध्ये देखील ती खूप कमी प्रमाणात वापरली जाते. यामुळे ती देशात आणि ते ही मारेकऱयांपर्यत आली कशी ? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
त्यातच देशातील आघाडीचा दबंग अभिनेता सलमान खान याला धमकी. यामुळे नक्कीच बॉलिवूड पुन्हा गँगवॉरच्या ]िदशेने तर निघाले नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे.
-अमोल राऊत, मुंबई








