पुलाची शिरोली / वार्ताहर
मोटारसायकल व महिंद्रा बोलेरो गाडीचा अपघात होवून हालोंडी ता. हातकणंगले येथील अनिल शिवगोंडा पाटील वय वर्षे ४९ हे जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हालोंडी फाटा येथे झाला.
शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल पाटील हे आपल्या मोपेड गाडीवरून घरी जात होते. दरम्यान, वडणगे येथील जीप चालक रामदास मारुती धनवडे याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने बोलेरो जीप चालवून अनिल पाटील यांच्या मोटारसायकलला समोरून धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले.
या अपघाताची फिर्याद सुनिल पाटील यांनी दिली असुन वडणगे ता. करवीर येथील रामदास मारुती धनवडे यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल पाटील हे हालोंडीचे माजी उपसरपंच होते.