वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडने इंग्लंडमधील इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी नाकारली. जून महिन्यात लंडनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी तसेच आगामी अॅशेस मालिकेसाठी ताजेतवाने राहण्याच्या हेतूने बोलँडने इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
2021 च्या डिसेंबरमध्ये झालेल्या अॅशेस मालिकेत वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडने आपले कसोटी पदार्पण केले होते. आपण भविष्यकाळात देशासाठी तसेच स्थानिक राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये व्हिक्टोरिया संघाकडून खेळणे पसंद करेन असे 34 वर्षीय बोलँडने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. चालू वर्षी आपल्याला इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध झाली होती. पण मला स्वत:ची दीर्घकालीन क्रिकेट कारकीर्द करावयाची असल्याने महत्त्वाच्या स्पर्धांसाठी दमछाक होण्यापासून मी स्वत:ला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्याने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी बोलँडने ऑस्ट्रेलियातर्फे 18 गडी बाद केले होते. सदर अॅशेस कसोटी मालिकेत पॅट कमिन्सने 21 तर मिचेल स्टार्कने 19 गडी बाद केले होते. ऑस्ट्रेलियाने ही अॅशेस मालिका 4-0 अशी एकतर्फी जिंकली होती. लंडनच्या ओव्हल मैदानावर आयसीसीची विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम लढत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान होणार आहे. तर अॅशेस मालिकेतील पहिली कसोटी 16 जूनपासून एजबेस्टन येथे खेळवली जाणार आहे.









