इन्स्ट्राग्रामवरून 50 महिलांना फसविणारा गजाआड : 4 लाख ऊपयांहून अधिक रोकड उकळली
प्रतिनिधी /बेळगाव
पोलीस उपनिरीक्षकाच्या नावे इन्स्ट्राग्रामवर बोगस खाते उघडून अनेकांना ठकविणाऱ्या एका ठकसेनाला जिल्हा सीईएन पोलिसांनी अटक केली आहे. आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून या महाभागाने 50 हून अधिक तरुणी व महिलांनाही फसविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. विजय श्रीशैल बारली (वय 28, मूळचा रा. अथणी, सध्या रा. हुबळी) असे त्याचे नाव आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी त्याला अटक केली आहे.
निपाणी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्या नावे इन्स्ट्राग्रामवर बोगस खाते उघडून विजयने अनेकांना ठकविल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारासंबंधी 20 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. अत्यंत चाणाक्ष्यपणे या प्रकरणाचा छडा लावून पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर व त्यांचे सहकारी एच. एल. धर्मट्टी, ए. एच. बजंत्री, के. आर. इमामण्णावर, जी. एस. लमाणी, एस. आय. भंडी, एन. आर. फड्याप्पण्णावर, ईराण्णा नडविनहळ्ळी, सी. ए. केळगडे आदींनी विजयच्या मुसक्या आवळल्या आहेत. नागरिकांची फसवणूक करण्यासाठी विजयने अनिल कुंभार यांच्या नावे बोगस खाते उघडले. या खात्याला अनिलकुमार यांच्या फोटोंचाही वापर करण्यात आला. या बोसग खात्याला 1 लाख 12 हजार फॉलोवर्स आहेत. आपण पोलीस उपनिरीक्षक आहोत, असे भासवून त्याने अनेकांना गंडविले आहे. 50 हून अधिक तरुणी व महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 4 लाख रुपयांहून अधिक रोकड उकळली आहे.
9 बोगस खाती
जिल्हा सीईएनच्या अधिकाऱ्यांनी विजय बारलीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने इन्स्ट्राग्रामवर 9 बोगस खाती उघडल्याचे सामोरे आले आहे. खास करून महिलांचा विश्वास संपादन करून नोकरीच्या आमिषाने विजयने त्यांचीही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.









