खानापूर : यडोगा येथील युवक संजय उर्फ शुभम यल्लाप्पा कुप्पटगिरी हा शनिवारी गणपती विसर्जन करण्यासाठी मलप्रभा नदीत गेला असता बुडाला होता. शनिवारपासून त्याचा शोध घेण्यात येत होता. तिसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या युवकाचा मृतदेह नदीत तरंगताना दिसून आला. मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी खानापूर सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी बाराच्या दरम्यान आपले वडील, काका व इतर कुटुंबातील लोकांच्या समवेत गणेश विसर्जन करत असताना संजय उर्फ शुभम यल्लाप्पा कुपटगिरी हा बुडाल्याने एकच गोंधळ उडाला. तातडीने खानापूर, नंदगड पोलीस स्थानकाला, तसेच अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. खानापूर आणि नंदगड पोलीस स्थानकाचे अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. एसडीआरएफच्या दलाने शनिवारी व रविवारी शोध घेण्याचा प्रयत्न केला.
दिवसभर चाललेल्या शोधमोहिमेला रविवारी सायंकाळपर्यंत प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात आले. गावातील काही युवक, नंदगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी व परिसरातील शेकडो युवक मलप्रभा नदीच्या बंधाऱ्यावर, तसेच नदीच्या दोन्ही काठांवर शोध घेत होते. ज्या ठिकाणी गणपती विसर्जन करताना बुडाला होता, त्याच ठिकाणी दुपारी साडेतीनच्या दरम्यान मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
गणपती विसर्जन करताना पाण्याच्या प्रवाहामुळे शुभमला बाहेर येता आले नाही. त्याच ठिकाणी बुडाला होता. नदीच्या पात्राच्या तळाशी असलेल्या दगडाच्या कपारीत मृतदेह अडकल्याने त्याचा शोध लागत नव्हता. तीन दिवसांनी त्याचा मृतदेह पाण्यावर आला. शुभम पोहण्यात तरबेज होता. मात्र शरीरावरील कपडे, तसेच पाण्याच्या प्रचंड वेगाच्या प्रवाहामुळे अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यडोगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे.









