खून करून घटप्रभा नदीवरील पुलाखाली टाकले
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील घटप्रभा नदीवरील पुलाखाली अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. गळा आवळून त्याचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी पुलाखालील एका दगडावर टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी सुमारे 20 ते 30 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह शनिवारी दुपारी ताब्यात घेतला आहे. शुक्रवार दि. 18 च्या मध्यरात्रीपासून शनिवारी 19 ऑगस्टच्या दुपारी 2.30 या वेळेत ही घटना घडली आहे. यमकनमर्डी पोलिसांनी यासंबंधी लुकआऊट नोटीस जारी केली असून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बेळगावहून संकेश्वरकडे जाताना घटप्रभा नदीवर लागणाऱ्या पुलाखाली हा मृतदेह आढळून आला आहे. कोणी व कोणत्या कारणासाठी या अनोळखी तरुणाचा खून केला? याचा उलगडा झाला नाही. 157 सेंटीमीटर उंची, गहू वर्ण, उभट चेहरा, साधारण देहयष्टी असे त्याचे वर्णन आहे. त्याने आपल्या अंगावर राखाडी टी-शर्ट व नाईट पँट परिधान केली आहे. वरील वर्णनाच्या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यासाठी 0833-276333 यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









