धारवाडहून बेळगावला आलेल्या रेल्वेच्या सीटखाली आढळला अनोळखी मृतदेह
बेळगाव : धारवाडहून बेळगावला आलेल्या पॅसेंजर रेल्वेच्या सीटखाली अनोळखी बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी दुपारी डब्याची सफाई करताना बालिकेचा मृतदेह आढळून आला असून या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे. रेल्वे क्रमांक 07357 ही म्हैसूर-धारवाड एक्स्प्रेस धारवाडहून बेळगावपर्यंत पॅसेंजर बनून धावते. बुधवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही रेल्वे बेळगावला पोहोचली. सायंकाळी 4 वाजता कर्मचारी डब्यांची सफाई करताना एस-3 बोगीच्या सीट क्रमांक 20 च्या खाली सुमारे तीन वर्षीय अनोळखी बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे. तातडीने बेळगाव रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आला आहे. सीआरपीसी कलम 174(सी) अन्वये संशयास्पद मृत्यूप्रकरण नोंद करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बालिकेच्या अंगावर कसल्याही प्रकारचे व्रण किंवा जखमा नाहीत. 3 फूट उंची, लालसर वर्ण, अंगाने सडपातळ, उभट चेहरा, सरळ नाक असे तिचे वर्णन असून या बालिकेने आपल्या अंगावर गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस फ्रॉक परिधान केला आहे. तिच्या गळ्यात केसरी रंगाचा सिद्धारुढ स्वामींचा ताईत असून डाव्या पायात काळा दोरा बांधण्यात आला आहे. वरील वर्णनाच्या बालिकेची ओळख पटविण्यासाठी 0831-2405273 या क्रमांकावर बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बालिकेचा मृत्यू नेमका कशामुळे?
रेल्वे डब्यात अनोळखी बालिकेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी सध्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद केली असली तरी या बालिकेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा उलगडा शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरच होणार आहे. रेल्वेत कुटुंबीयही होते का, सीटखाली तिला कोणी ढकलले, ही बालिका हरविली होती की मृत्यूनंतर तिला सीटखाली ढकलण्यात आले आहे? आदी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम रेल्वे पोलीस करीत आहेत.









