सहा दिवसांनी सरकारी घाटावर आढळला मृतदेह : घातपात की आत्महत्या याबाबत चर्चा : वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा
भिलवडी/वार्ताहर
पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कु. मानसी संदेश चौगुले (12) रा. मधली गल्ली, भिलवडी, ता. पलूस हिचा मृतदेह सांगली सरकारी कृष्णा घाटावरती तब्बल सहा दिवसांनी आढळून आला. मानसी ही गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी सात रोजी सायंकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडली होती. ती बराचवेळ घरी परत आली नसल्याने तिचे वडिल संदेश चौगुले यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार भिलवडी पोलिसात दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही तक्रार दाखल होताच भिलवडी पोलिसांनी तिचा शोध घेतला. परंतु ती आढळून आली नाही. याबाबत सोशल मीडियातूनही ती बेपत्ता असल्याची माहिती पसरवण्यात आली होती. परंतू मानसीचा कोणताही ठावठिकाणा मिळाला नाही. त्यामुळे तिचे कुटुंबिय हवालदिल झाले होते. मानसी ही भिलवडी सेकंडरी स्कूलमध्ये सातवी तुकडी ‘ब’ मध्ये शिक्षण घेत होती. शाळेतील तीच्या मैत्रीणीकडे ही चौकशी केली. परंतु तीचा काहीच पत्ता लागला नव्हता. पोलिसांनीही याबाबत आवाहन केले हाते.
गेली सहा दिवस मानसीचा शोध सुरू होता.
भिलवडी पोलीस व ग्रामस्थ, तरुण यांच्या मदतीने दोन पथक बनवून भिलवडीपासून सांगलीपर्यंत बोटीच्या सहाय्याने शोध सुरु केला. मंगळवार, 13 रोजी मानसीचा मृतदेह सांगली सरकारी कृष्णा घाटावर आढळून आला. हा मृतदेह मानसीचा असल्याची ओळख वडील व नातेवाईकांनी केली. त्यानंतर मानसीचा मृतदेह वसंतदादा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी पाठवण्यात आला.
चौकट
इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीचा मृतदेह सहा दिवसांनी सांगलीत सापडल्याने कृष्णाकाठावर हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात नेमके काय घडले असावे याबाबत चर्चा आहे. मुलगी भिलवडीतून बेपत्ता झाली तर मृतदेह सांगलीत कसा आढळला? हा घातपात आहे की आत्महत्या? इतर कोणते कारण आहे का? अशी चर्चा परिसरातून होत आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट करणे पोलीसांच्या समोर आव्हान ठरत आहे. वैद्यकीय अहवाल काय येतो, याची पोलीस आणि ग्रामस्थांनाही प्रतीक्षा आहे