लांजा :
येथील मुचकुंदी नदीत रात्रीच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गेलेले शांताराम गणपत नरसळे (६२, रा. हर्चे-पनोरेची वरचीवाडी) यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
नरसळे हे शेती व मासेमारी करीत होते. शनिवारी रात्री ८.३० च्या दरम्यान मासे पकडण्यासाठी ते नेहमीप्रमाणे मुचकुंदी नदीपात्रामध्ये गेले होते. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने पत्नी व वाडीतील ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी किनाऱ्यावर त्यांना चपला दिसल्या. शांताराम यांचा मुलगा प्रतीक हा मुंबई-नालासोपारा येथे राहत असल्याने त्याचा चुलत भाऊ प्रशांत याने त्याला फोन करून याची माहिती दिली. रविवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरु केली. अखेर दुपारी ३.३० वाजता शेळवी येथील मुचकुंदी नदीपात्रामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबतची खबर मुलगा प्रतीक याने लांजा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.








