वृत्तसंस्था/ कोक्राझार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी आसामच्या कोक्राझारमध्ये ऑल बोडो स्टुडंट्स युनियनच्या (एबीएसयू) 57 व्या वार्षिक संमेलनात भाग घेतला. या संमेलनाला संबोधित करताना शाह यांनी बोडो करारावर स्वाक्षरी केल्याप्रकरणी काँग्रेसने आमची थट्टा केली होती, परंतु याच करारामुळे बोडोलँडमध्ये शांतता आणि विकास आल्याचा दावा केला आहे.
केंद्र सरकारने 35 लाख लोकसंख्या असलेल्या बोडोलँडच्या विकासासाठी 1500 कोटी रुपये दिले आहेत. बोडो युवांनी आता 2036 च्या ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करावी, ही ऑलिम्पिक स्पर्धा अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. बोडो कराराच्या 82 टक्के तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत आणि उर्वरित तरतुदी पुढील 2 वर्षांमध्ये लागू करण्यात येतील असे शाह म्हणाले.
जानेवारी 2020 मध्ये करार
केंद्र सरकार, आसाम सरकार आणि बोडो समुदायादरम्यान जानेवारी 2020 मध्ये बोडो करार झाला होता. त्या कराराचा उद्देश अंतर्गत संघर्ष रोखणे होता. बोडो समुदायाचे लोक दशकांपासून ब्रह्मपुत्रा नदीच्या काठाच्या वरील क्षेत्राला स्वतंत्र बोडोलँड राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत होते. अन्य समुदायांच्या उपस्थितीमुळे बोडो समुदायाची ओळख, संस्कृतीला धोका असल्याचे त्यांचे मानणे होते. बोडो समुदाय आणि त्याच्या अनेक संघटनांनी स्वत:ची मागणी पूर्ण व्हावी म्हणून हिंसेचा मार्ग देखील पत्करला होता. परंतु जानेवारी 2020 मध्ये झालेल्या बोडो करारानंतर ही हिंसा थांबली होती.
काँग्रेसला केले लक्ष्य
अमित शाह यांनी शनिवारी आसाममध्ये लचित बरफुकन पोलीस अकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना काँग्रेसला लक्ष्य केले होते. काँग्रेसने आसाममध्ये शांतता प्रस्थापित होऊ दिली नाही. परंतु पंतप्रधान मोदींनी आसाममध्ये शांतता प्रस्थापित करत ईशान्येचा विकास केला आहे. मागील 10 वर्षांमध्ये 10 हजारांहून अधिक युवांनी शस्त्रास्त्रs खाली ठेवत मुख्य प्रवाहात सामील होण्याचे पाऊल उचलले असल्याचे शाह यांनी म्हटले होते.









