दोघांचे बेळगाव विमानतळावर तर वडगावच्या मायलेकींचे मृतदेह उशिराने गोव्यात झाले दाखल
बेळगाव : प्रयागराजमधील कुंभमेळ्यात पुण्यस्नानाच्यावेळी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावमधील चारपैकी दोघा भाविकांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी विमानाने बेळगावात आणण्यात आले. वडगाव येथील मायलेकींचा मृतदेह दिल्लीहून रात्री गोव्यात दाखल झाला असून रात्री उशिरा ते बेळगावला आणण्यात येणार आहेत. शेट्टी गल्ली येथील अरुण कोपर्डे (वय 61) व शिवाजीनगर येथील महादेवी हणमंत बावनूर (वय 48) यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी सांबरा विमानतळावर दाखल झाले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश आदी अधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून आदरांजली वाहिली. विमानतळावर कुटुंबीयांचा एकच आक्रोश सुरू होता. उपलब्ध माहितीनुसार टॅफिक जाममुळे प्रयागराजहून मृतदेह घेऊन सुटलेल्या दोन रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका नवी दिल्लीला वेळेत पोहोचली नाही. त्यामुळे त्यांना बेळगावला यायला विलंब झाला. वडगाव येथील मेघा दीपक हत्तरवाट (वय 24), तिची आई ज्योती दीपक हत्तरवाट (वय 44) यांचे मृतदेह विमानाने गोव्याला आणण्यात आले आहेत.
गोव्याहून बेळगावला आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. रात्री उशिरा ते बेळगावात दाखल होणार आहेत. दोन मृतदेहांबरोबर चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या बेळगाव येथील तिघा भाविकांनाही विमानाने बेळगावला आणण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. वेळेत मृतदेह बेळगावला पोहोचावेत यासाठी त्या चारही मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे बेळगावात दाखल झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. नवी दिल्ली येथील कर्नाटक भवन येथे महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगाव येथील भाविकांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर विमानाने हे मृतदेह बेळगावला हलवण्यात आले. शेट्टी गल्ली व शिवाजीनगर परिसरात मृतांचे कुटुंबीय व नातेवाईकांची गर्दी झाली होती. पुण्यस्नानासाठी गेलेले आपले कुटुंबीय सुखरूप परतले नाहीत, याचे दु:ख सहन न झाल्यामुळे कुटुंबीयांचा एकच आक्रोश सुरू होता.
कोपर्डे व बावनूर यांच्या मृतदेहांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणीची प्रक्रिया
प्रयागराजमधील गर्दीमुळे बेळगाव येथील चारही भाविकांच्या मृतदेहावर नवी दिल्ली येथे उत्तरीय तपासणी करण्यात येणार होती. मात्र, तेथेही झाली नाही. सांबरा विमानतळावर दाखल झालेल्या अरुण कोपर्डे व महादेवी बावनूर यांच्या मृतदेहावर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मारिहाळ पोलिसांनी यासाठीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. वडगाव येथील मेघा हत्तरवाट व ज्योती हत्तरवाट या मायलेकींच्या मृतदेहावर एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करून उत्तरीय तपासणीची प्रक्रिया करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. रात्रीच ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, अरुण कोपर्डे यांच्यावर रात्री उशिरा सदाशिवनगर स्मशानभूमीत तर महादेवी बावनूर यांच्यावर मारिहाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.









