ऑनलाईन टीम / तरुण भारत :
इंदापुरात विहिरीचे बांधकाम करताना रिंग पडून ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या चारही मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. या मजुरांच्या शोधासाठी एनडीआरएफकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. तब्बल 65 तासानंतर पहिला मृतदेह एनडीआरएफ पथकाच्या हाती आला. त्यानंतर 2 तासांनी आणखी दोन मृतदेह सापडले. तर 70 तासानंतर चौथा मृतदेह सापडला.
मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत विहिरीचे काम करताना रिंग ढासळल्याने सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 32), जावेद अकबर मुलाणी (वय 30), परशुराम चव्हाण (वय 30), मनोज मारुती चव्हाण (वय 40) हे चार मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. या मजुरांच्या शोधासाठी एनडीआरएफकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तळ ठोकून होते. ही विहीर जवळपास 100 फूट खोल आणि 1200 फूट व्यास असलेली होती. 6 पोकलेन मशिनच्या साह्याने विहिरीच्या बाजूचा मातीचा ढिगारा हटविण्यात येत होता. अखेर आज सलग चौथ्या दिवशी हे मृतदेह एनडीआरएफ पथकाच्या हाती लागले. त्यानंतर ही शोधमोहिम थांबविण्यात आली. हे सर्व मजूर इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील रहिवाशी होते.
दरम्यान, संबंधित विहिरीचे बांधकाम बेकायदेशीर असून, या मालकाने चार कुटुंबांचा जीव धोक्यात घातला. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बेलवाडीच्या महिला सरपंच मयुरी जामदार आणि नागरिकांनी केली आहे.








