वार्ताहर/ हर्णै
1 ऑगस्टला मासेमारीचा मुहूर्त खराब वातावरणामुळे हुकल्यानंतर मोठय़ा आशेने नौका सज्ज केलेल्या मच्छीमारांना जोरदार पावसामुळे मासेमारीला पुन्हा ब्रेक लावावा लागला. यामुळे दापोली तालुक्यातील हर्णै बंदरातील उलाढाल पूर्ण ठप्प असून मासळी उतरवण्यासाठी बोटी जयगड-रत्नागिरी बंदरात जात असल्याने हर्णै येथील लाखोंची उलाढाल थंडावल्याचा थेट परिणाम येथील उद्योगांवर होत आहे.
मासेमारी हंगामाला सुरुवात झाली असून रत्नागिरी-जयगडजवळील समुद्रात म्हाकूळ मिळत असल्याने हर्णैतील नौका दक्षिणेकडे गेल्या आहेत. जयगड-रत्नागिरी येथे या मासळीला दरही जादा मिळतो. या दोन्ही ठिकाणी अधिक सुविधा असल्याने अवांतर खर्चही कमी होत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. यामुळे हर्णै बंदरात रोज 100 ऐवजी जेमतेम 2 ते 3 बोटी मासळी उतरत आहेत. परिणामी या ठिकाणची लाखोंची उलाढाल थंडावल्याचा थेट परिणाम येथील उद्योगांवर होत आहे.
मत्स्यसाठय़ांची हर्णेकर पाहताहेत आतुरतेने वाट
बंदरातील डिझेल व्यावसायिक, बर्फ सेन्टर, किराणा दुकानदार, रिक्षा वाहतूकदार, वडापाव गाडय़ांसह हर्णै बाजारपेठेवरही याचा मोठा परिणाम दिसत आहे. बंदरात 30 ते 40 हातगाडय़ांपैकी सध्या केवळ 3 हातगाडय़ानीच व्यवसाय सुरू ठेवला आहे. मासेमारी हंगाम सुरू होऊन 23 दिवस होऊनही येथील उलाढाल पूर्णपणे ठप्प आहे. रत्नागिरी-जयगडजवळील मत्स्यसाठे जसजसे उत्तरेकडे सरकतील तसतशा या नौका दाभोळ-हर्णे बंदराजवळ मासेमारी करतील. त्यानंतरच हर्णे बंदर गजबजणार आहे. त्या वेळची स्थानिक आतुरतेने वाट पाहत आहेत.









