दापोली :
वाऱ्याचा वेग आणि पाऊस कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा मच्छीमारी नौका समुद्रावर स्वार झाल्या आहेत. यामुळे पाच दिवस थंडावलेल्या जिल्ह्यातील मासेमारीला पुन्हा वेग आला आहे.
यंदा मे महिन्यात अवकाळी पावसामुळे लवकर हंगाम संपवावा लागल्याने मच्छीमारांचे नुकसान मोठे नुकसान झाले होते. मात्र नवीन हंगामात पापलेट व म्हाकुळ मासळीने मच्छीमारांची जाळी भरल्यामुळे यंदाची ‘दमाणी’ तेजीत आली. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी समुद्र खवळल्याने आणि हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आल्यामुळे नौका पुन्हा किनाऱ्यावर आल्याने मासेमारी ठप्प झाली होती. मात्र गुरुवारी हवामान अनुकूल दिसल्याने मच्छीमारांनी आपल्या नौका पुन्हा समुद्रावर स्वार केल्या आहेत. सध्या दमाणी म्हणजे वाटेकरी असल्यामुळे गणपतीपूर्वी एक ‘पाळी’ मिळेल ही आशा मच्छीमारांना आहे. यामुळे नौका मालकांचे आणि व्यापाऱ्यांचे लक्ष या एका ‘पालटी’कडे लागले आहे.
- गणपतीनंतर वाट्यात बदल
१ ऑगस्ट रोजी शासकीय बंदी समाप्त झाल्यावर मासेमारीला सुरुवात होते. गणपती सणाला पुन्हा मासेमारीला ब्रेक लागतो. गणपती सणापर्यंत मिळणाऱ्या एकूण मासेमारीच्या फायद्यातील अर्धा-अर्धा भाग करण्यात येतो. अर्धा भाग बोटींच्या मालकांना व अर्धा भाग बोटींवर काम करणाऱ्यांचा असतो. यात अनेकजण गब्बर होतात. मात्र गणपती सणानंतर या वाटणीत बदल होतो. गणपती सणानंतर मात्र येणारा सर्व फायदा हा बोट मालकांचा असतो. या सणानंतर बोटीवर काम करणाऱ्यांना पगार देण्यात येतो. होणाऱ्या फायद्याचा बोटीवर काम करणाऱ्यांचा संबंध संपुष्टात येतो. ही अलिखित प्रथा दरवर्षी पाळण्यात येते.








