दूध उत्पादक रमेश नाईक यांचा दावा
पणजी : गोवा डेअरीत चाललेल्या गैरकारभारासंबंधी सुरू असलेली चौकशी दूध व्यावसायिक रमेश नाईक यांच्या वैयक्तिक तक्रारीवर आधारित असल्याचा दावा संबंधित संचालक करत होते. परंतु उच्च न्यायालयात सहकार निबंधकांनी स्वत: चौकशीस प्रारंभ केला असल्याची माहिती दिली आहे. हे प्रकरण आता त्या संचालकांवर शेकणार असे रमेश नाईक यांनी म्हटले आहे. सहकार निबंधकांनी केलेल्या चौकशीनंतर संचालक मंडळास कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. तीच नोटीस आता सुमोटो म्हणून स्वीकारत चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत ही तक्रार आपल्या वैयक्तिक तक्रारीवर असल्याने त्यातून काहीच निष्पन्न होणार नसल्याची समजूत करून घेत संचालक मंडळ निर्धास्त होते. आता न्यायालयाने तीन महिन्यांच्या आत त्या प्रकरणाचा निकाल लावण्यास सांगितले आहे, अशी माहिती रमेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.









