11-12वीमध्ये विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार : शिक्षण पद्धतीत मोठे बदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने बुधवारी नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण पद्धतीत मोठे बदल जाहीर केले. 2024 पासून सीबीएसईसह विविध राज्य मंडळांद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. तसेच अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार असून त्यामध्ये किमान एक भाषा भारतीय असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अभ्यासक्रम प्रणाली जारी केली. आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. या नव्या शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमधील समज आणि कौशल्ये विकसित होतील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या दोन संधी मिळतील, असे मंत्रालयाने म्हटले आहे. असे नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत हे बदल करण्यात आले आहेत.
शिक्षण मंत्रालयाच्या नवीन फ्रेमवर्कनुसार इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. इयत्ता 11 आणि 12 मधील विषयांची निवड ही कला, विज्ञान आणि वाणिज्य या विषयांपुरती मर्यादित राहणार नाही. विषयांच्या निवडीमध्ये लवचिकता आणली जाणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचाही नव्या अभ्यासक्रमाच्या चौकटीत समावेश करण्यात आला आहे. सध्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून एकदाच घेतल्या जात होत्या. अशा स्थितीत कोणताही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास उत्तीर्ण होण्यासाठी केवळ कंपार्टमेंटलायझेशन आणि छाननीचा मार्ग उरतो. मात्र, कोरोनाच्या काळात सीबीएसई बोर्डाकडून एक वर्षासाठी सेमिस्टरनिहाय परीक्षा घेण्यात आल्या. पण परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा सीबीएसईच्या परीक्षा जुन्याच धर्तीवर घेतल्या जाऊ लागल्या. आता पुढील वर्षीपासून त्यात सर्व शिक्षण मंडळांच्या बोर्ड परीक्षांसाठी नवी पद्धती अवलंबली जाणार आहे.
कस्तुरीरंगन यांच्या मार्गदर्शनाखाली, सुकाणू समितीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यासक्रम तयार केला असून तो सरकारला सादर केला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण व्यवस्थेत करावयाच्या बदलांच्या घोषणेद्वारे 2024 शैक्षणिक सत्रासाठी पुस्तके विकसित करण्याची माहिती देण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम आराखडा शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नवीन संधी मिळतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.









