मंगळवारी थंडा प्रतिसाद : बुधवारपासून अर्ज देण्यास प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध खात्याची परवानगी देण्यासाठी 8 पोलीस स्थानकांमध्ये सिंगल विंडो सुविधा सुरू करण्यात आली आहे. याकरिता मनपा अधिकाऱयांची मंगळवारपासून नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी मंडळांचा प्रतिसाद लाभला नाही. बुधवारपासून गणेशोत्सव मंडळांनी अर्ज देण्यास प्रारंभ केला आहे. मात्र प्रतिज्ञापत्राच्या सक्तीमुळे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांची धावपळ वाढली आहे.
शहरात 400 हून अधिक गणेशोत्सव मंडळे असून, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. हेस्कॉम, महापालिका, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. विविध खात्यांची परवानगी घेण्यासाठी शासनाच्यावतीने सिंगल विंडो सुविधा सुरू करण्यात येते. सिंगल विंडो सुविधा सुरू करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात 2 अधिकाऱयांची नियुक्ती करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी सोमवारी बजावला होता. त्यानुसार मंगळवारपासून सिंगल विंडो योजनेंतर्गत मनपाचे अधिकारी प्रत्येक पोलीस स्थानकात दुपारी 3.30 ते 6.30 यावेळेत हजर होत आहेत. मंगळवारी सार्वजनिक मंडळांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. मात्र बुधवारपासून परवानगीसाठी सार्वजनिक मंडळांनी अर्ज देण्यास प्रारंभ केला आहे. पण परवानगीकरिता मंडळाकडून हमीपत्र घेण्याची सूचना शासनाने केली असल्याने सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱयांची डोकेदुखी वाढली आहे.
अर्ज देण्यासाठी पोलीस स्थानकात गेलेल्या मंडळाच्या पदाधिकाऱयांकडे हमीपत्राची विचारणा करण्यात आली. त्यामुळे आता मंडळाच्या पदाधिकाऱयांना हमीपत्रासाठी धावपळ करावी लागणार आहे. हमीपत्राचा मजकूर महापालिकेकडे अद्याप उपलब्ध नाही. हमीपत्रावर कोणता मजकूर लिहावा, असा मुद्दा मंडळांसमोर निर्माण झाला आहे. गुरुवारी हमीपत्राचा मजकूर दिला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
परवानगीसाठी सार्वजनिक मंडळांना हमीपत्राची सक्ती
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तीन दिवसांत परवानगी देण्यात यावी, याकरिता सिंगल विंडो सुविधा सुरू करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. मात्र शासनाच्या नियमावलींचे पालन करण्याबाबत आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी मंडळाची असेल, असे हमीपत्र देण्याची सक्ती गणेशोत्सव मंडळांना करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना 20 रुपयाच्या बाँड पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.
गणेशोत्सव मंडळांना विविध खात्याची परवानगी देण्यासाठी सिंगल विंडो सुविधा यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. बेळगाव महापालिकेत कित्येक वर्षांपासून सिंगल विंडोअंतर्गत गणेशोत्सव मंडळांना परवानगी दिली जाते. मात्र याकरिता कोणत्याही प्रकारचे हमीपत्र देण्याची सक्ती करण्यात आली नव्हती. मात्र तीन दिवसांत परवानगी देण्याचा आदेश बजावून हमीपत्र घेण्याची सूचना शासनाने केली असल्याने सार्वजनिक मंडळे अडचणीत आली आहेत. विविध खात्यांनी घातलेल्या नियमावलींचे पालन केले जाईल, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जबाबदार राहील, असा मजकूर हमीपत्रामध्ये राहणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जबाबदारी वाढली असून, यापुढे कोणत्याही अनुचित घटनेला सरकार जबाबदार राहणार नाही, असाच काहीसा प्रकार शासनाच्या या नियमावलीमुळे निदर्शनास आला आहे. सरकारने सर्व जबाबदारी मंडळांवर सोपविल्याचा प्रकार या आदेशामुळे दिसून येत आहे.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हेस्कॉम, महापालिका, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, अशा विविध खात्यांकडून परवानगी घ्यावी लागते. यापूर्वी प्रत्येक कार्यालयात परवानगीसाठी धावपळ करावी लागत होती. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची धावपळ कमी करण्याच्यादृष्टीने बेळगाव महापालिकेत यापूर्वीच सिंगल विंडो सुविधा सुरू करण्यात आली आहे. पण कोणत्याही प्रकारचे हमीपत्र द्यावे लागत नव्हते. मात्र आता 20 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र द्यावे लागणार आहे. गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या सहीसह हमीपत्र परवानगी अर्जासोबत जोडावे लागणार आहे.









