भारत अलर्ट : सीमेवर वाढला तणाव
वृत्तसंस्था/ ढाका
त्रिपुराच्या अगरतळा येथे बांगलादेशी उच्चायोगात तोडफोड झाल्याच्या विरोधात खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी (बीएनपी) निगडित संघटनांनी मोठी घोषणा केली आहे. बीएनपीच्या तीन सहकारी संघटना जातीयतावादी जुबो दल, स्वेचसेबक दल आणि छात्र दलाने ढाका ते अगरतळाच्या दिशेने मोर्चा सुरू केला आहे. हा मोर्चा बुधवारी सकाळी 9 वाजता ढाक्यातील नयापलटनमध्ये बीएनपीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोरून सुरू झाला आहे. हे पाहता भारताच्या सुरक्षा यंत्रणा देखील सतर्कता बाळगत आहेत.
केवळ बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायोगावर हल्ला झाला नसून आमच्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करत सांप्रदायिक दंगली भडकविण्याचा कट रचण्यात आला असल्याचा दावा बीएनपीच्या सहकारी संघटनांनी केला आहे. बीएनपीने भारतावर बांगलादेशच्या विरोधात कट रचण्यासारखे अनेक आरोप केले आहेत.
सीमेवर वाढली सतर्कता
बीएनपीशी संबंधित शेकडो लोकांनी भारताच्या दिशेने मोर्चा काढण्याची घोषणा केल्यापासून सीमेवर भारतीय सुरक्षा दल अलर्टवर आहे. कुठल्याही संभाव्य तणावाच्या स्थितीसाठी सीमेवर तयारी केली जात आहे. बीएनपीशी निगडित या संघटनांनी तीन दिवसांपूर्वी ढाका येथे रॅली काढत अगरतळा येथील घटनेचा निषेध नोंदविला होता. तर बीएनपीशी शिष्टमंडळाने भारतीय उच्चायोगात जात स्वत:चे निवेदन सोपविले होते.
त्रिपुरा येथील अगरतळामध्ये 2 डिसेंबर रोजी बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायोगाच्या इमारतीवर हल्ला झाला होता. बांगलादेशात चिन्मय दास कृष्ण यांच्या अटकेच्या विरोधात लोक रॅली काढत असताना हा प्रकार घडला होता. यादरम्यान काही लोक उच्चायोगात शिरले होते. या लोकांनी बांगलादेशचा ध्वज उतरवून तोडफोड केल्याचा आरोप आहे. भारत सरकारने याप्रकरणी खेद व्यक्त केला होता.
बांगलादेशात ऑगस्ट महिन्यात शेख हसीना यांच्य विरोधात हिंसक निदर्शने झाली होती. यामुळे शेख हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला आहे. तेव्हापासून भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये तणाव दिसून येत आहे. माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा पक्ष बीएनपी विशेषकरून भारताच्या विरोधात आक्रमक झाला आहे.









