ऑनलाईन टीम / तरुण भारत :
लांबणीवर पडलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल, असा अंदाज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला आहे.
एका वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, मुंबई महापालिकेची लांबलेली निवडणूक व्हावी, असे आम्हालाही वाटते. आम्ही निवडणूक लांबवली नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने दाखल केलेल्या याचिकांमुळे निवडणूक लांबली. आरक्षणासंदर्भातील एक याचिकाही ठाकरे गटाने दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सर्व याचिका एकत्र करून स्टेटस को दिला आहे. या स्टेटस कोमुळेच निवडणुका होऊ शकल्या नाहीत.
उलट उद्धव ठाकरे आम्हालाच म्हणतात, तुम्ही निवडणुका घेत नाही. तुम्ही दाखल केलेल्या याचिका मागे घ्या, म्हणजे स्टेटस को हटेल आणि निवडणुका होतील. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसीची निवडणूक होईल, असा माझा अंदाज असल्याचे फडणवीस म्हणाले.