वृत्तसंस्था/ माऊंटमाँगेनियो
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर यजमान न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध कडवी झुंज दिली. टॉम ब्लंडेलच्या समयोचित शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात 306 धावापर्यंत मजल मारली. तत्पुर्वी इंग्लंडने आपला पहिला डाव 9 बाद 325 धावावर घोषित केला होता. इंग्लंडने नाममात्र 19 धावांची आघाडी मिळवली. दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 बाद 79 धावा जमवत न्यूझीलंडवर 98 धावांची बढत घेतली आहे.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावात सलामीच्या देवॉन कॉन्वेने 151 चेंडूत 1 षटकार 7 चौकारासह 77 धावा झळकवल्या. वेगनरने 32 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 27 धावा जमवल्या. टॉम ब्लंडेलने 181 चेंडूत 1 षटकार आणि 19 चौकारासह 138 धावा झळकवल्या. कुगलेजीनने 1 षटकार आणि 2 चौकारासह 20, तसेच कर्णधार साऊदीने 1 चौकारासह 10 धावा जमवल्या. इंग्लंडतर्फे रॉबिनसन आणि अँडरसन हे प्रभावी गोलंदाज ठरले. रॉबिनसनने 54 धावात 4, अँडरसनने 36 धावात 3 तर ब्रॉड, लिच आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. न्यूझीलंडच्या ब्लंडेलचे हे कसोटीतील चौथे शतक आहे. 32 वर्षीय ब्लंडेलने गेल्या वर्षी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सातत्याने फलंदाजी करताना 383 धावा झळकवल्या होत्या तरी पण न्यूझीलंडला ही मालिका 0-3 अशी गमवावी लागली होती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा आता नवा विश्वविक्रम नोंदवण्याच्या समीप पोहोचला आहे. अँडरसन आणि त्याचा साथीदार स्टुअर्ट ब्रॉड यांनी आतापर्यंत इंग्लंडकडून 133 कसोटी सामन्यात खेळताना 1000 गडी बाद केले आहेत. 16 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा यांनी 104 कसोटीत 1001 बळी मिळवण्याचा विश्वविक्रम केला होता. न्यूझीलंडविरुद्ध येथे सुरू असलेल्या या पहिल्या कसोटीत अँडरसन आणि ब्रॉड यांनी 1000 बळींचा टप्पा गाठला आहे. आता त्यांना विश्वविक्रमाशी बरोबरी करण्याकरिता आणखी एक बळी मिळवावा लागेल. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत अँडरसनने 36 धावात 3 तर रॉबिनसनने 54 धावात 4 तसेच ब्रॉड, रुट आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला आहे.
19 धावांची नाममात्र आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात दिवसअखेर 16 षटकात 2 बाद 79 धावा जमवल्या. टिकनेरने सलामीच्या डकेटला तर कुगलेजीनने क्रॉलेला बाद केले. क्रॉलेने 6 चौकारासह 28 तर डेकटने 4 चौकारासह 25 धावा जमवल्या. ओली पॉप 14 तर ब्रॉड 6 धावावर खेळत आहे. न्यूझीलंडतर्फे कुगलेजीन, टिकनेर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव 58.2 षटकात 9 बाद 325 डाव घोषित, न्यूझीलंड प. डाव 82.5 षटकात सर्वबाद 306 (ब्लंडेल 138, कॉन्वे 77, वेगनर 27, कुगलेजीन 20, टीम साऊदी 10, रॉबिनसन 4-54, अँडरसन 3-36, ब्रॉड 1-72, लिच 1-84, स्टोक्स 1-38), इंग्लंड दु. डाव 16 षटकात 2 बाद 79 (क्रॉले 28, डकेट 25, पॉप खेळत आहे 14, ब्रॉड आहे 6, टिकनेर 1-26, कुगलेजीन 1-2).









