सरकारच्या अनुमतीशिवाय लॅपटॉप खरेदी करण्यास मनाई
उत्तर कोरियासंबंधी लोक बरेच काही ऐकत असतात. अनेकदा उत्तर कोरियातून हैराण करणाऱया गोष्टी समोर येतात. या देशाच्या अनेक पैलूंबद्दल लोक अद्याप अनभिज्ञ आहेत. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी तयार केलेले नियम-कायदे अन्य देशांना बुचकळय़ात पाडणारे आहेत.
हेअरस्टाइल
उत्तर कोरियात सरकारने सांगितलेली हेअरस्टाईलच लोकांना ठेवता येते. तेथे महिला केवळ 15 हेअरस्टाईलपैकी एक स्टाइल स्वतःसाठी निवडू शकतात. तर अविवाहित महिलांना स्वतःचे केस छोटे ठेवावे लागतात. याचबरोबर पुरुष 15 हेअरस्टाईलपैकी एक स्टाइल निवडू शकतात. सरकारने मंजूर केलेल्या हेअरस्टाईलच्या व्यतिरिक्त कुणी अन्य हेअरस्टाइल ठेवल्यास त्याला अटक केली जाते.
तीन पिढय़ांपर्यंत शिक्षेचा नियम
उत्तर कोरियातील एक नियम जगाला हैराण करणारा आहे. उत्तर कोरियात कुठल्याही एका व्यक्तीच्या चुकीची शिक्षा तीन पिढय़ांपर्यंत देण्याचा नियम देखील आहे. या नियमाच्या अंतर्गत कुणी दोषी आढळल्यास त्याला तुरुंगात डांबण्यात येते. तर त्याच्या कुटुंबातील तीन पिढय़ांनाही तुरुंगात ठेवण्यात येते.ं
28 वेबसाइट्स
उत्तर कोरियाचे लोक केवळ 28 वेबसाइट्सच ब्राउज करू शकतात. येथील लोकांसाठी स्वतःची इंट्रानेट सिस्टीम तयार करण्यात आली असून त्याला क्वांगम्योंग किंवा ब्राइट म्हटले जाते. विशेष म्हणजे ही सिस्टीम मोफत आहे.
4 टीव्ही चॅनेल
उत्तर कोरियात केवळ 4 टीव्ही चॅनेल्स असून त्यावर सरकारची मालकी आहे. तर यातील एक ऍथलेटिक चॅनेल देखील असून यात उत्तर कोरियाच्या क्रीडाक्षेत्राचा इतिहासाबद्दल माहिती दिली जाते.
लॅपटॉप खरेदीवर बंधन
उत्तर कोरियात सरकारच्या अनुमतीशिवाय कुणीही लॅपटॉप खरेदी करू शकत नाही. तेथे सरकारी अनुमतीशिवाय लॅपटॉप खरेदीवर बंदी आहे. उत्तर कोरियात लॅपटॉप अत्यंत महाग असून ते खरेदी करणे अत्यंत अवघड आहे.
दक्षिण कोरियाच्या सामग्रीपासून दूर
उत्तर कोरियाच्या लोकांना दक्षिण कोरियन उत्पादनांपासून दूर राहण्याचा इशारा दिला जातो. दक्षिण कोरियाच्या उत्पादनांसह तेथील फॅशन, चित्रपट आणि संगीतापासूनही दूर राहण्यास सांगितले जाते. तर कुणी दक्षिण कोरियन सामग्रीचा वापर करत असेल तर त्याला शिक्षा दिली जाते. उत्तर कोरियाच्या लोकांना निळय़ा रंगाची जीन्स परिधान करण्याची परवानगी नाही. हा रंग अमेरिकेच्या भांडवलशाहीचे प्रतिनिधित्व करणारा असल्याचे उत्तर कोरियाच्या हुकुमशहाचे मानणे आहे.









