अनुदान उपलब्ध : लाभ घेण्याचे आवाहन : उत्पादनवाढीसाठी उपयुक्त
प्रतिनिधी /बेळगाव
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात ठिबक सिंचनसाठी अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. शिवाय शेती हिरवाईने फुलत आहे. संबंधित शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनच्या अनुदानासाठी जवळच्या रयत संपर्क केंद्रात अर्ज करावा, असे आवाहन बागायत खात्याने केले आहे.
जिल्ह्यात बागायत शेती वाढली असून तब्बल दोन लाखांहून अधिक शेतकरी बागायती शेती करू लागले आहेत. त्यामुळे साहजिकच उत्पादनात वाढ झाली आहे. किमान दोन एकर क्षेत्रापर्यंत ठिबक सिंचन योजना राबविण्यात आली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना 75 टक्के तर मागासवर्गीय शेतकऱ्यांना 90 टक्क्यांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. केळी, आंबा, चिंच, फणस, झेंडू, सूर्यफूल, मोगरा यासह भाजीपाला पिकासाठी ठिबक सिंचन योजना उपयुक्त ठरणारी आहे.
फळ-फुलांची शेती एकऊप करण्यासाठी शासनाचे अनुदान महत्त्वाचे आहे. एकूण उत्पादन वाढविण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू असून विविध पिकांसाठी आणि फळ लागवडीसाठी अनुदान दिले जात आहे. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे आणि अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खात्याने केले आहे.
खात्यामार्फत अधिक उत्पादनासाठी माती परीक्षण केले जाते. गणेशपूर येथील कार्यालयात मातीचे परीक्षण होते. स्थानिक वातावरणात येणाऱ्या पिकांना प्राधान्य दिले जाते. ठिबक सिंचनद्वारे भाजीपाला, बागायत शेती, मसाले आणि सजावटीची फुलझाडेदेखील सजविता येतात.
ठिबक सिंचनचे महत्त्व
ठिबक सिंचनमुळे 40 ते 50 टक्के पाण्याची बचत होऊन पिकावू क्षेत्र अधिक पाण्याखाली येते. वेळेवर आणि योग्य पाणी मिळाल्याने उत्पादनात 20 ते 30 टक्के वाढ होते. खताची आणि औषधाची मात्रा योग्य प्रमाणात मिळते. त्यामुळे रोपाची वाढ झपाट्याने होते.
महांतेश मुरगोड (सहसंचालक, बागायत खाते)
बागायत खात्यामार्फत ठिबक सिंचनसाठी अनुदान दिले जात आहे. याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि बागायती शेती फुलवावी. फळे-फुले उत्पादकांसाठी ठिबक सिंचन लाभदायक आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन वेळेची व श्रमाची बचत करावी.
गुरुनाथ धायगोंडे (शेतकरी, कडोली)
ठिबक सिंचनद्वारे दोन एकर क्षेत्रात कोबीज केले आहे. ठिबक सिंचनसाठी अनुदान मिळाले आहे. यामुळे पाण्याची बचत होते. शिवाय श्रमही कमी लागतात. खत आणि औषधांची मात्रा योग्य प्रमाणात मिळते. त्यामुळे पीक जोमाने येऊन उत्पादनात वाढ होते.









