आपली पृथ्वी अनेक नैसर्गिक आश्चर्यांनी भरलेली आहे. भर समुद्रात गोड्या पाण्याच्या विहिरी, अतिथंड प्रदेशात उष्ण पाण्याचे निर्झर आदी आश्चर्ये तर आता प्रत्येकाच्या परिचयाची झाली आहेत. पण आणखी आश्चर्यांचा शोधही लागत आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात असणारा हिमाच्छादित प्रदेश अंटार्कटिका येथेही असेच एक नैसर्गिक आश्चर्य असून त्याची अद्भूतता तर अवर्णनीय असल्याची माहिती दिली जाते. तसे पाहू गेल्यास या आश्चर्याचा शोध 110 वर्षांपूर्वीच लागला होता. जेव्हा मानवाचा वावर या बाराही महिने अतिथंड अवस्थेत असणाऱ्या खंडावर होऊ लागला, तेव्हा या खंडामध्ये दडलेली अनेक नैसर्गिक रहस्येही परिचयाची होऊ लागली. या संशोधनातूनच हा अद्भूत प्रकार मानवाच्या परिचयाचा झाला आहे.
या खंडावर असा एक पर्वत आहे, की ज्याच्यावरुन रक्तासारख्या लालभडक रंगाच्या पाण्याचा धबधबा कोसळतो. त्यामुळे याला ‘ब्लड फॉल्स’ किंवा ‘रक्तजलपात‘ असे सार्थ नाम देण्यात आले आहे. या खंडावरच्या ‘टेलर’ नामक हिमनदीमुळे हा धबधबा निर्माण झाला आहे. या धबधब्यातून कोसळणाऱ्या जलाचा रंग लाल कसा, यावर व्यापक संशोधन झाले असून अद्यापही ते होत आहे. त्याला लाल रंग दोन कारणांमुळे प्राप्त झाला आहे. एक, विशिष्ट प्रकारचे ‘शेवाळ’ किंवा ‘अल्गी’ येथे निर्माण होते, जे लालभडक रंगांचे असते. त्याचा अंश या पाण्यात मोठ्या प्रमाणात आहे. तसेच दुसरे कारण असे की, या पाण्यात लोहक्षारांचे प्रमाण मोठे आहे. लोहक्षारांमुळे या जलाला लाल रंग चढला आहे. शुभ्र हिमावर कोसळणारे हे लाल जल पाहणे हा चित्तथरारक अनुभव पर्यटकांनी घेतला आहे.









