बेळगाव : जैन इंटरनॅशनल टेड ऑर्गनायझेशन (जितो) बेळगाव विभागातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दि. 15 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत गोवावेस येथील महावीर भवन येथे शिबिर होणार आहे. औषध नियंत्रण विभागाच्या सहकार्याने हे शिबिर घेतले जाणार असल्याची माहिती जितोचे चेअरमन मुकेश पोरवाल यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कोरोनानंतर रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा उपक्रम जितोने यावर्षी राबविला. केएलई ब्लड बँक, बिम्स ब्लड बँक, महावीर ब्लड बँक, बेळगाव ब्लड बँकचे कर्मचारी रक्त संकलन करणार आहेत. तसेच रक्तदात्याचा एक वर्षासाठी एक लाखापर्यंतचा अपघाती विमा उतरविला जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन सेक्रेटरी नितीन पोरवाल यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधून रक्तदान शिबिर
एका वेळच्या रक्तदानामुळे तिघा जणांचे जीव वाचविता येऊ शकतात. रक्ताअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याची बाब समोर आली असल्याने स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचा उपक्रम जितो राबवत आहे. जितो ही एक देशातील मोठी संघटना असून त्यांच्याकडून सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली जात असल्याची माहिती हर्षवर्धन इंचल यांनी दिली. यावेळी विक्रम जैन, अभय हादिमनी, श्रीकांत विरगी यांच्यासह इतर उपस्थित होते.









