देशभरात होणार आयोजन ः आरोग्यमंत्र्यांकडून रक्तदानाचे आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 17 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत स्वेच्छने रक्तदानासाठी एक मोठे अभियान सुरू केले जाणार आहे. 17 सप्टेंबर हा पंतप्रधान मोदींचा जन्मदिन आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय 17 सप्टेंबरपासून रक्तदान अमृतमहोत्सवाचे आयोजन करत आहे. या अभियानाद्वारे 1.5 लाख युनिट रक्त एकत्र करण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले आहे. तर दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी भारतात राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो.
मानवतेसाठी रक्तदान करा असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले आहे. रक्तदान अमृतमहोत्सवात सामील होण्यासाठी आरोग्य सेतू ऍपवर नोंदणी करण्याची सूचना केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे.
भारताकडे ब्लड युनिट साठविण्याची पुरेशी क्षमता आहे. भारत याप्रकरणी विश्वविक्रम करू शकतो, परंतु हे लोकांकडून होणाऱया रक्तदानावर अवलंबून असल्याचे एका अधिकाऱयाने म्हटले आहे. रक्तदात्यांना प्रेरित करणे आणि एक डाटाबेस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अभियानामागे सर्वात मोठा उद्देश समाजात एकजूट होत लोकांनी या चांगल्या कार्यात सामील व्हावे हा असल्याचे अधिकाऱयाकडून सांगण्यात आले.









