ठाणे सत्तरी येथे तणावपूर्ण वातावरण : म्हाऊस पंचायतीने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून घेतली हरकत
वाळपई : म्हादई नदीच्या रक्षणासंदर्भात रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षाने आजपासून सत्तरी तालुक्यातून पदयात्रेला सुऊवात केली. मात्र म्हाऊस पंचायतीने या संदर्भात हरकत घेतल्यामुळे पोलीस व उपजिल्हाधिकाऱ्यांनी सदर पदयात्रा ठाणे व कोपार्डे येथे रोखून धरली. यामुळे रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती अशी की, रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे म्हादई नदी संदर्भात जनजागृतीसाठी पदयात्रेचे आयोजन केले होते. ही यात्रा आजपासून सत्तरी तालुक्यातून सुरू करण्याचा निर्णय या संघटनेने घेतला होता. त्यानुसार संध्याकाळी 4 वाजता ठाणे येथील पंचायत मैदानावरून पदयात्रेला सुऊवात झाली. मात्र पदयात्रा सुरू होण्यापूर्वी स्थानिक पोलीस यंत्रणा, उपजिल्हाधिकारी मामलेदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही पदयात्रा रोखली. म्हाऊस पंचायतीने यासंदर्भात हरकत घेणारे पत्र उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यामुळे सदर पदयात्रा रोखण्याची विनंती यावेळी अधिकाऱ्यांनी रिव्होल्युशनरी गोवन्सला केली.
यावेळी आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब, आमदार वीरेश बोरकर व पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली. यावर सदर पदयात्रेला परवानगी नसल्यामुळे ही पदयात्रा अडविल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या पदयात्रेसाठी रितसर परवानगी घेण्यात घेण्याची सूचना उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी केली. त्यानुसार पक्षातर्फे परवानगी देण्यासंदर्भात अर्ज उपजिल्हाधिकांना सादर केले. मात्र तो फेटाळून लावत या पदयात्रेमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यामुळे परवानगी देऊ शकत नसल्याचे उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी स्पष्ट करण्यात आले. या पदायात्रेला हरकत घेणाऱ्यांची नावे जाहीर करा, असा आग्रह धरला. मात्र रात्री उशिरापर्यंत सदर नावे स्पष्ट करू न शकल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून या संदर्भाचा निषेध केला. यामुळे परिस्थिती तणावाची बनली होती. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलक आक्रमक होत असल्यामुळे जास्त पोलीस कुमक मागविण्यात आलेली आहे. उपजिल्हाधिकारी प्रवीण परब व पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.









