लोकांना त्रास, प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी लक्ष घालण्याची मागणी
मडगाव : मडगावच्या एसजीपीडीए मार्केट संकुलानजीकची गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा न राहून मागील दोन-तीन दिवस रस्त्यावर जणू तळे साचले आहे आणि लोकांना तसेच वाहनांना यातून वाट काढत जावे लागत असल्याचे दिसून येते. एसजीपीडीने ही गटारे उपसून पाणी वाहून जाण्यासाठी वाट करावी, अशी मागणी येथील दुकानदार तसेच बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या लोकांकडून करण्यात येत आहे. पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येणे शक्य होत नसल्याने दुचाकीचालकांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लोक येथे खरेदीसाठी भेट देणे टाळत असून येथील दुकानदारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत असल्याची कैफियत त्यांच्याकडून मांडण्यात येत आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेले आमदार दाजी साळकर यांनी या प्रकरणी लक्ष घालून आवश्यक उपाययोजना करावी. गरज भासल्यास जिल्हाधिकारी वा पालिकेकडून आपत्कालीन सेवेच्या अंतर्गत आवश्यक कामे करून घ्यावीत, अशी मागणी केली जात आहे.









