खानापूर मलप्रभा नदीघाटालगतच्या बंधाऱ्यात योग्य पद्धतीने पाणी न अडविल्याने पाणीटंचाई भासण्याचा धोका : पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष
खानापूर : येथील मलप्रभा नदीघाटाला लागून असलेल्या जुन्या ब्रिजकम बंधाऱ्यात पाटबंधारे खात्याने पाणी योग्य पद्धतीने अडविण्यात आले नसल्याने काही मुशीतून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. परिणामी फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत नगरपंचायतीने पाटबंधारे खात्याला पूर्णक्षमतेने पाणी अडवण्यासाठी पत्रव्यवहार करूनदेखील पाटबंधारे खात्याकडून दखल घेण्यात येत नसल्याचे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मलप्रभा नदीघाटाजवळ नव्याने ब्रिजकम बंधारा बांधण्यात आला आहे.
या ठिकाणी पाटबंधारे खात्याकडून पाणी अडवण्यात येते. दरवर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाणी अडवण्यात येते. यावर्षी डिसेंबरच्या 10 तारखेनंतर पाणी अडविण्यात आले आहे. मात्र पाणी अडवताना दोन मुशी अर्धवट अवस्थेत अडविण्यात आल्या आहेत. तर बाकीच्या पाच मुशी चार फुट सोडून पाणी अडवण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. शहराला पाणीपुरवठा मे अखेरपर्यंत होण्यासाठी पूर्णक्षमतेने पाणी अडवणे गरजेचे आहे. अगोदरच मलप्रभा पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठण्याची क्षमताच कमी झाली आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच नदीपात्र कोरडे पडते. त्यातच पाटबंधारे खात्याने पाणी अडवताना पूर्ण मुशा बंद केल्या नसल्याने पाण्याचा विसर्ग होत आहे.
पाटबंधारे खात्याकडून दखल नाही
याबाबत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले की, आम्ही गेल्या दहा दिवसांपासून वारंवार पाणी अडवण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. तसेच लेखी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र पाटबंधारे खात्याकडून कोणत्याही प्रकारची अद्याप दखल घेतली नसल्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाणीप्रश्न गंभीर बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी पाटबंधारे खात्याने तातडीने सर्व मुशी बंद करून पाणी अडवणे आवश्यक आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ
मलप्रभा नदीच्या ब्रिजकम बंधाऱ्याजवळ मोठ्याप्रमाणात गाळ आणि वाळू साचल्याने बंधाऱ्याची उंचीच कमी झाली आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पाणी साठवण्याची क्षमता ाढमी झाली आहे. याबाबत शहरवासियांकडून वेळोवेळी मलप्रभा पात्राची खोली वाढवण्याची मागणी होऊनदेखील नगरपंचायत, पाटबंधारे खाते तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून साफ दुर्लक्ष झाल्याने यावर्षीही मे व जून महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
ब्लॉकची चोरी : चार दिवसात लाकडी ब्लॉक घालणार
याबाबत पाटबंधारे खात्याचे विकास खन्नूकर यांना विचारले असता ते म्हणाले, खात्याकडून पाणी अडवण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नियोजन केले होते. त्यासाठी बेळगावहून पाणी अडवण्याचे ब्लॉक आणून मलप्रभा बंधाऱ्याजवळ ठेवण्यात आले होते. मात्र यावर्षी जवळपास 15 ब्लॉक चोरी करण्यात आले आहेत. त्यामुळे हे ब्लॉक कमी पडले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली आहे. पाणी अडवण्यासाठी लाकडी ब्लॉक तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या चार दिवसात लाकडी ब्लॉक करून पाणी अडविण्याचे नियोजन आहे.









