सुधाकर काशीद,कोल्हापूर
Raksha Bandhan Special : आज शुभ दिवस,अशुभ दिवस,आजची पौर्णिमा खरी,नाही.उद्याची खरी,आज भद्रा म्हणजे त्रासात भर.. असल्या नको त्या उलट-सुलट चर्चेच्या घेऱ्यात आज रक्षाबंधनाचा धागा लटकला.पण शुभ-अशुभ क्षणांचा आणि बहीण-भावांच्या प्रेमाचा काय संबंध? भावाबहिणीच्या पवित्र नात्याला कसल्याही चर्चेत निष्कारण गुंतवण्याचा प्रश्नच येत नाही,अशा सरळ साध्या भावनेने सविता व कृष्णा या अंध बहीण भावांनी बुधवारी सकाळी रक्षाबंधनाचा सोहळा हृद्य वातावरणात पार पाडला व बहीण-भावाच्या नात्याचा धागा आणखीनच घट्ट केला.
यातील सविता व कृष्णा हे बहीण भाऊ दोघेही अंध. सविता 14 वर्षाची.कृष्णा अकरा वर्षाचा.दोघेही अंधशाळेत रहायला आणि शिकायला. ते सख्खे बहीण भाऊ.पण दोघांनीही एकमेकाचा चेहरा कधी पाहिलेला नाही.पण म्हणून त्यांच्यातल्या नात्याला,प्रेमाला कधी आंधळेपण आले नाही.रक्षाबंधन म्हणून मंगळवारी सविताने राखी आणून ठेवली होती.सकाळपासून तिची लगबग सुरू झाली.हे दोघेही बहीण भाऊ मिरजकर तिकटी येथील अंधशाळेत रहायला.सकाळपासून कृष्णा चांगला ड्रेस घाल,डोक्याला तेल लाव,कृष्णा भांग पाड,अशी एखाद्या आईसारखी भूणभूण तिने कृष्णाच्या पाठीशी लावली होती.एखादी चुकीची चर्चा खूप वेगाने आणि खूप ताकदीने सर्वत्र पसरते,तशी आज रक्षाबंधनाचा दिवस चांगला नाही,अशी चर्चा अंधशाळेतही पोचली होती.पण सविता आणि शाळेचे प्रशासन आजच रक्षाबंधनाच्या तयारीत.राखी बांधायला कसला शुभ आणि अशुभ क्षण? हा सवितासारख्या मुलींचा सर्वांना एक भोळाभाबडा प्रश्न होता.अर्थातच त्यामुळे आजच रक्षाबंधन करायचा निर्णय झाला.
शाळेतील मावशांनी पाट मांडला.रांगोळी काढली व कृष्णात,सरांच्यासोबत शाळेच्या हॉलमध्ये आले.दोघांचे चेहरे फुललेले होते.पाटावर मांडी घालून कृष्णात बसला.समोर आरती घेऊन सविता.दोघेही एकमेकाला पाहू शकत नव्हते.पण जणू काही डोळे भरून आपण एकमेकाला पाहतोयच,या भावनेचे तेज त्यांच्या चेह्रयावर निरांजनाच्या मंद प्रकाशात जाणवत होते.हळवी सविता आरती करताना नकळत डबडबलेले डोळे ओढणीच्या कोपराने हळूच पुसत होती.त्यांनी कृष्णाच्या हातात राखी बांधली,गाठ मारून झाली तरी तिने कृष्णाच्या हातावरची आपली नाजूक पकड पुढेही काही वेळ कायम ठेवली.या रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्या दोघांतील नात्याची गाठ नक्कीच आणखी घट्ट झाली.पण अशी पवित्र भावना जपताना शुभ-अशुभ क्षण,कर्मकांड कशाला पाळता? अशी डोळस शिकवणही या दोघा अंध भावंडानी यानिमित्ताने समाजाला दिली.
खरंच यांना दृष्टी आली तर…
ज्ञान प्रबोधन संचलित मिरजकर तिकटी येथील अंधशाळेत 50 मुले, मुली आहेत, ते सर्वजण तेथेच राहतात.त्यांची देखभाल करणारा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग खूप चांगला आहे.ज्या बहीण भावांनी बुधवारी आग्रहाने रक्षाबंधन केले ते सविता लक्ष्मण यमगर व कृष्णा लक्ष्मण यमकर हे चंदगडजवळच्या सडे गुडवळे या अवघ्या पंधरा घरांच्या वाड्यावस्तीतले. या अंध मुलांना घरी ठेवून शिकवणे कठीण म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी या दोघांना कोल्हापुरात ठेवले आहे.आता गणपतीला त्यांचे वडील किंवा आई त्या दोघांना न्यायला येणार आहेत.दोघेही गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.अतिशय गोंडस अशा या बहीण-भावाच्या चेहऱ्यावरचे हास्य विलक्षण आहे.जर काही प्रगत उपचारांनी त्यांना दृष्टी आली तर या हास्याला चार चाँद लागू शकणार आहेत. तुम्ही आम्ही त्यांच्यासाठी आपापल्या परीने धडपड करायला काय हरकत आहे?