आज अयोध्या सजली सजली
आर्या आंबेकरच्या अतीव मधुर स्वरात हे गाणं ऐकताना वाटलं की धन्य धन्य ती नगरी! आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून अयोध्यानगरीचं जे सुंदर चित्र काढलं आहे तीच अयोध्यानगरी आज आपल्या लाडक्या रामलल्लासाठी नटूनथटून आनंदाने मुहूर्ताची वाट पाहत आहे. प्रत्यक्ष प्रभुराम जेव्हा वनवासातून परतले तेव्हा तिला काय वाटलं असेल हे ती जाणे आणि कौसल्यामाई जाणे. विरहही प्रदीर्घ झाला की तो फार फार अवघड होऊन बसतो. आणि हिला तर शतकानुशतकं विरह सहन करायला लागलाय. त्यामुळे आजच्या सोहळ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
शहराशहरांतून, गावागावांतून, वाड्यावस्त्यांतून रामाचा जागर सुरू आहे. सगळीकडे अक्षत देऊन आमंत्रण दिलं जातंय. ज्या मंदिरासाठी फार मोठा न्यायालयीन लढा द्यावा लागला ते उभारून देव बसवण्याचं काम प्रत्यक्षात येतं आहे. सच्चा रामभक्त आज शबरीच्या अंतरीची आस जाणू शकतोय.
विनवित शबरी रघुराया रे
तुजसाठी वेचिली बोरे
भागला भुकेला असशिल देवा
जमविला रानचा मेवा
दीनेची दुबळी सेवा
ही गोड मानुनी घे रे
अशी आर्जवी विनंती करणाऱ्या शबरीच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या राजा बढे यांनी. संगीत कट्टर रामव्रती असणाऱ्या सुधीर फडके यांनी आणि स्वर गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचे! घरात होऊ घातलेली प्राणीहत्या टाळण्यासाठी बालवयातच घर सोडून निघालेली शबरी मतंग ऋषींच्या आज्ञेने उभा जन्म रामाची वाट बघत राहिली. रोज आश्रम झाडून, सडा रांगोळी काढून, रामरायासाठी फुलं, फळं कंदमुळं गोळा करून किंचितही न कंटाळता किंवा निराश न होता आणि किती काळ लोटला हे अजिबात न मोजता अविरत भक्ती श्रद्धेने करत राहिली आणि शेवटी रामरूप झाली. भग्न झालेलं राममंदिर पुनश्च एकदा उभं राहावं यासाठी ही शबरीनिष्ठा ठेवत पिढ्या संपल्या आणि आज तो दिवस उजाडतो आहे. जेव्हा राम उद्या येणार हे शबरीला कळलं तेव्हा अत्यानंदाने ती आपल्या सभोवतालच्या लतावेलींनाच सांगू लागली.
लतांनो सांगु का तुम्हा?
उद्या श्रीराम येणार
वनाला सर्व या आता
खरा आनंद होणार
वा गो मायदेव यांची ही कविता किती म्हणून गोड आहे! या कवितेतली शबरी झाडांना विचारते तुम्ही उद्या मला फळं द्याल ना? झऱ्यांना विचारते की तुम्ही पाणी द्याल ना? वेलींना ती सांगते मला उद्या फुलं पुरवा बरं! का? तर सगळं रामाला द्यायचं आहे म्हणून. स्वत:साठी ती काही मागत नाही. सगळं काही त्या रामरायासाठी. ठायीच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा हे ती अक्षरश: नकळत पाळते. दंडकारण्यात घनघोर वनात एकाकी राहणारी ती स्त्राr एवढा कृतनिश्चय, एवढं धारिष्ट्या, चिकाटी कुठून बरं आणत असेल? आतासारखी तेव्हा संपर्क साधने तर नव्हतीच, पण काळच मुळी महाराष्ट्र जन्माला येण्यापूर्वीचा होता. ही निष्ठा हाच महाराष्ट्र जन्माचा पाया असावा का? हल्लीच्या मंडळींना हे पाहण्याची गरज आहे. आणि जेव्हा राम प्रत्यक्ष येतात तेव्हा ती त्यांना अनन्यभावाने शरण जाते.
पाहीन पूजिन टेकीन माथा
तोच स्वर्ग मज तिथेच येईल
पुरेपणा जीवना
रामा रघुनंदना
बस्स…तिची इच्छा तेवढीच आहे. आणि मग
आज चकोराघरी पातली भुकेजली पौर्णिमा
धन्य मी शबरी श्रीरामा,
लागली श्रीचरणे आश्रमा
असं म्हणत म्हणत ती रामचरणी लीन होते. तिला इतके प्रश्न पडतात की काय करू, कसं करू, काय देऊ, काय घेऊ आणि किती करू अशी तिची अवस्था होते.
स्याम गौर सुंदर दोऊ भाई
सबरी परी चरण लपटाई
असं संत तुलसीदासांनी त्यांच्या भेटीचं हृद्य वर्णन केलं आहे.
नैवेद्या पण काय देउ मी?
प्रसाद म्हणुनी काय घेउ मी?
असं होऊन जातं तिचं. प्रभुंना आंबट फळं देऊ नयेत म्हणून प्रत्येक फळाची चव घेऊन फक्त मधुर फळंच ती रामांना देते. आता उष्टी फळं कशी खायची या पेचात पडलेल्या लक्ष्मणाला ती मोठ्या आर्जवाने विनवते.
का सौमित्री शंकित दृष्टी?
अभिमंत्रित ती, नव्हेत उष्टी.
या वदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा
काय कमाल सौंदर्य आहे या शब्दांत! किती उच्च दर्जाची ही शबरीच्या बोरांइतकीच गोड गोड गाणी आहेत गीतरामायणातली! गदिमा, बाबूजी म्हणजे रामलक्ष्मणाची सावली पडल्यासारखे म्हणायचे. ज्या तोंडांत सदैव रामनाम असतं, वेदांतील ऋचांनी जे मुख पवित्र आहे त्या मुखी लागलेली बोरं उष्टी कशी म्हणावीत? त्या मंत्रांनी सिद्ध आहेत ती.
लायी हो किस ठौर से, इतने मीठे बेर।
किस रस सें बौरे इन्हें, रस का इनमें ढेर?
गद्गद भिलनी हो गयी, सुनकर मधुरे बोल।
लगी झूलने भीलनी, चढ़ी प्रेम की दोल?
त्यावर ती शबरी जे उत्तर देते ते त्या बोरांपेक्षाही गोड आहे. ती म्हणते,
हे रघुनाथ! न मीठे हैं बेर ये,
मीठो तुम्हारो ही चित्त है भारी।
हाथ के छूए न बेर मेरे कोऊ
चाखै, जो जानि ले जाति हमारी।
ओछी ते ओछी है भील की जाति,
औ तापर नारी मैं नीच गँवारी।
माँगि के खात सराहत जात ये,
पूर्व के पुण्य की मेरी है बारी?
शबरी असणं ही अतिशय दुर्मिळ वृत्ती आहे. जिचं वर्णन त्यानंतर घडलेल्या महाभारतातील गीतेत आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन म्हणजेच फळाची आशा न करता कर्म करीत राहणे. शबरी त्यापुढेच होती. कारण श्रीराम येणारच हा तिला पक्का विश्वास होता. तोच फळाला आला. शबरीचं जीवन धन्य झालं. भिल्ल जातीत जन्माला येऊनही तिने तपस्विनी म्हणून साक्षात परब्रह्म प्राप्त करून घेतलं. हीच वृत्ती बाळगून आजचा दिवस पाहण्यासाठी देह टिकवून राहिलेल्या रामरायाच्या सर्व शबरींना त्याच्याआधी विनम्र अभिवादन!
-अपर्णा परांजपे-प्रभु








