वृत्तसंस्था/ मेरठ
उत्तरप्रदेशच्या मेरठ येथे मंगळवारी सकाळी साबण तयार करणाऱ्या एका कारखान्यात मोठा विस्फोट झाल्याने त्याची पूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने कारखान्याचे छतच उडून गेले आहे. स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने तेथे पोहोचले आणि मदत तसेच बचावकार्य हाती घेण्यात आले.
या स्फोटानंतर कारखान्याचे अवशेष मोठ्या अंतरापर्यंत पसरले आहेत. तसेच या स्फोटामुळे परिसरातील घरांचेही नुकसान झाले आहे. स्फोटावेळी कारखान्यात 8 कामगार काम करत होते. त्यांच्यासोबत दोन जेसीबी चालकही तेथे होते. हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील 4 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमी कामगार हे मृत्यूशी झुंज देत आहेत. जिल्हाधिकारी दीपक मीणा यांनी या दुर्घटनेची पुष्टी दिली आहे.
मेरठमधील लोहियानगर भागात ही दुर्घटना घडली आहे. येथील नागरी वस्तीत साबणाचा कारखाना चालविला जात होता. अचानक झालेल्या स्फोटामुळे कारखान्याची पूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. तसेच परिसरातील काही घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याचबरोबर बचावकार्य सुरू असताना आणखी एक स्फोट तेथे झाला, यामुळे दोन जेसीबी चालक जखमी झाले. साबणाच्या कारखान्यात फटाक्यांच्या निर्मितीचे काम सुरू होते असा संशय व्यक्त होत आहे. सध्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या कारखान्याविषयी अधिक माहिती मिळवत असून पोलिसांकडून तपास केला जात आहे.









