वाडा’ला सापडली 12 पॉझिटिव्ह प्रकरणे, ठावठिकाणा पडताळणीसंदर्भात 97 वेळा अपयश
वृत्तसंस्था/ माँट्रियल
जागतिक उत्तेजकविरोधी एजन्सीने (वाडा) भारताची राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्था (नाडा) खेळाडूंच्या ठावठिकाणाबाबतचे कलम योग्य प्रकारे हाताळत नसल्याचे स्पष्ट पुरावे सापडले असल्याचे म्हटले आहे. एका तपासादरम्यान त्यांना 70 खेळाडूंच्या बाबतीत 12 ‘पॉझिटिव्ह’ चाचण्या आणि ठावठिकाणाच्या संदर्भात 97 अपयशी प्रकरणे सापडली आहेत. ‘वाडा’च्या स्वतंत्र गुप्तचर आणि तपास विभागाने (आय अँड आय) ‘नाडा’च्या चाचणी कार्यक्रमातील घटक हे ‘वाडा’च्या संहितेनुरुप आणि चाचणी आणि तपासासाठीच्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार नसल्याच्या आरोपांनंतर तपासणी करून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
‘वाडा’ची दीर्घकाळ चाललेली ही तपासणी ’ऑपरेशन कॅरोसेल’ म्हणून ओळखली जाते. 2018 मध्ये ती सुरू करण्यात आली होती. ‘नाडा’ने आपल्या ‘रजिस्टर्ड टेस्टिंग पूल’मध्ये काही अॅथलीट्सच्या पुरेशी चाचण्या घेतल्या नसल्याचा आणि खेळाडूंच्या ठावठिकाणी माहितीचे योग्य निरीक्षण करण्यातही त्यांना अपयश आल्याचा पुरावा समोर आला आहे. या तपासाच्या अंतर्गत भारतातील निवडक खेळ आणि अॅथलीट्सचे निरीक्षण केले गेले. परिणामी, ‘नाडा’च्या सहकार्याने, 70 अॅथलीट्सच्या बाबतीत 12 ‘पॉझिटिव्ह’ चाचण्या (प्रतिकूल विश्लेषणात्मक निष्कर्ष) आणि ठावठिकाणा निश्चित करण्यासंदर्भातील 97 अपयशे सापडली’, असे या अहवालात म्हटले आहे.
‘नाडा’कडे संसाधनांची कमतरता असल्याचे स्पष्ट पुरावे असल्याचे ‘वाडा’ने नमूद केले आहे. 2016 पासून ‘वाडा’ ‘नाडा’सोबत त्यांचा उत्तेजकविरोधी कार्यक्रम सुधारण्यासाठी काम करत आहे. तसेच जागतिक उत्तेजकविरोधी संहिता आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी असलेली गैरअनुरूपता दूर करण्यासाठी विविध सुधारात्मक कृती केल्या जात आहेत, असे ‘वाडा’च्या ‘आय अँड आय’ विभागाचे संचालक गुंटर यंगर यांनी म्हटले आहे.
आमच्या गोपनीय माहिती मंच ‘स्पीक अप’वर येणाऱ्या सूचनांना समांतर प्रक्रिया आणि प्रतिसाद म्हणून ‘वाडा’ आणि ‘आय अँड आय’ने ’ऑपरेशन कॅरोसेल’ सुरू केले. ‘नाडा’कडील संसाधनांच्या कमतरतेचा अर्थ ते पुरेशा चाचण्या घेत नव्हते आणि अॅथलीट्सनी नमूद केलेल्या ठावठिकाणाबाबत समाधानकारक निरीक्षण होत नव्हते याचे त्याने स्पष्ट पुरावे उघड केले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. ‘ऑपरेशन कॅरोसेल’ सुरू झाल्यापासून ‘नाडा’ने सुधारात्मक उपाययोजना करण्याचा आणि आपली संसाधने वाढविण्याचा प्रयत्न केलेला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.









