महागाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकमेकाला दोष दिला आहे. नेत्यांचा ‘ब्लेम गेम’ झाला. जनतेचे काय? या प्रश्नातून त्यांची सुटका कधी होणार? पेट्रोल आणि डिझेल वरील कर राज्य आणि केंद्र कधी घटवणार?
राज्यातील आणि देशातील जनतेने राज्यकर्त्यांना काही गंभीर प्रश्न थेट विचारण्याची वेळ आली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो महागाईचा. नेते राजकारणात दंग आहेत आणि जनतेची अवस्था भरडले गेल्यासारखी झाली आहे. मात्र ही महागाई कधी कमी होणार? याचे उत्तर ना राज्याकडे आहे, ना केंद्राकडे! अर्थात हे उत्तर देण्याऐवजी आरोप करण्याला प्राधान्य दिल्यानेच मूळ प्रश्न बाजूला पडून इतर बाबींवर भोंगा वाजत राहतो, हे सातत्याने दिसत आहे. गेले काही महिने प्रत्येक कुटुंबात महागाई हा कळीचा मुद्दा ठरत आहे. मात्र त्याबाबत बोलायला कोणीच तयार नव्हते. समाज माध्यमांवर मात्र याबाबत पंतप्रधान मोदी यांचे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि मनमोहन सिंग यांच्या मौनावरील वक्तव्यांचे व्हिडिओ सर्वत्र फिरताना दिसत होते. आपल्या विरोधात सुरू असलेल्या या प्रमुख मुद्याची दखल पंतप्रधानांनी ज्या गतीने घेतली त्यावरून जनतेच्या मनातील भाव ओळखण्याची त्यांची क्षमता प्रकर्षाने दिसून आली आहे. कोरोना आढावा बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी महाराष्ट्र, बंगाल, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या बिगरभाजप राज्यांना दोष दिला. या राज्यांनी पेट्रोल वरील व्हॅट रद्द न केल्याने महागाई वाढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचे परिणाम या राज्याच्या राजकारणावर दिसू लागले आहेत. सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्र आणि बंगालच्या मुख्यमंत्र्यांची उत्तरे अधिक कठोर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र ज्या प्रमाणात केंद्राला कर देतो त्याच्या अत्यल्प प्रमाणात केंद्राकडून परतावा मिळतो. बिगरभाजप राज्य असल्याने महाराष्ट्रावर अन्याय केला जात असून अजून हक्काचे 26 हजार कोटी रुपये जीएसटी परतावा दिला नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. राज्य शासनाला सल्ला देण्यापेक्षा केंद्राने आपले सेस कमी करावेत, निवडणुका डोळय़ासमोर ठेवून पाच रुपये दर कमी केले आणि निकालानंतर दहा रुपये वाढवले अशा प्रकारचा आरोप केला आहे.
या आरोपानंतर सुद्धा राज्य सरकारने आपला कर कमी करण्याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. राज्याच्या तिजोरीवर वाढता ताण लक्षात घेऊन हा कर आकारला जात असल्याचे राज्याला सुचवायचे आहे. महाराष्ट्राचा अबकारी कर 26 टक्के आणि दहा रुपयांचा अधिभार आहे तर केंद्राचा कर 44 टक्के इतका आहे. त्यामुळे महाराष्ट्राने कर कमी करण्याबरोबरच केंद्रालाही कर कमी करण्यास भरपूर वाव आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण कमी होऊ शकतो. मात्र एकमेकांना दोष देण्याच्या नादात आपल्या वाटय़ाचा कर कमी करण्याचा दोन्ही सरकारांना विसर पडत आहे. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. जनतेची चिंता असणाऱया दोन्ही नेतृत्वाने आपापला कर घटवला पाहिजे. मात्र त्याऐवजी दोष देण्यातच आणि तेवढाच मुद्दा चर्चेला ठेवण्यात स्वारस्य दाखवले जात आहे. याविरोधात आवाज उठवणारी तिसरी शक्ती अत्यंत क्षीण झालेली असल्याने जनतेचा आवाज बसल्याची स्थिती असून ज्यांच्याकडे ती संधी आहे, ते मनसे सारखे पक्ष नको ते मुद्दे प्रचारात आणून स्वतःच स्वतःचे आव्हान संपुष्टात आणत आहेत.
आजींच्या घरची गेमचेंजर भेट
गुणरत्न सदावर्ते यांना केलेली अटक आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वाढलेल्या कारवाया लक्षात घेता आघाडी प्रंटफूटवर येऊन खेळू लागल्याचे दिसले. भाजपने आपल्या नेत्यांवर आकसाने कारवाई होत असल्याची टीका वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात हनुमान चालीसा म्हणायला जाऊ पाहणारे राणा दाम्पत्य अडचणीत आले असून पोलीस ठाण्यात मागासवर्गीय असल्याने पाणीही न दिल्याचे खा. नवनीत राणा यांचे आरोप पोलिसांनी व्हिडिओ जारी करून उलटवले आहेत. राणा दाम्पत्यामुळे शिवसेनेला आपल्या जुन्या शक्तीला जागृत करण्याची संधी मिळाली. मातोश्री बाहेर आलेल्या मोहित कंबोज यांच्या गाडीचा पाठलाग आणि किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक, राणांना आव्हान देणाऱया चंद्रभागा शिंदे आजींच्या घरी मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब हजेरी लावणे आणि विरोधकांना खुले आव्हान देणे या प्रकाराने भाजपलाही धक्का बसला असावा. चंद्रभागा आजिंच्या घरी ठाकरे परिवार गेला, मुख्यमंत्री यांच्या पत्नी आणि दोन्ही मुले अत्यंत साधेपणाने त्यांच्या परिवाराशी वागले याचा परिणाम मुंबईतील शिवसैनिकांच्या वर तर झालाच पण जुन्या भाजप कार्यकर्त्यांमधूनही या कृतीचे कौतुक होऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क कमी झालेला मुंबईतील आणि कोकणातील शिवसैनिक शिवसेनेपासून दुरावण्याची भीती व्यक्त केली जात होती. निवडणुका पुढे जाईल तशा त्यांना जोडण्यात शिवसेनेने गती घेतली होती. त्यातच राणा दाम्पत्याच्या निमित्ताने चंद्रभागा शिंदे आजी दुसऱयांदा महाराष्ट्रभर गाजल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना घरी जाऊन भेटण्याचे निर्णय घेतला. त्यामुळे परिघाबाहेर चाललेल्या मंडळींना आपल्याकडे ओढण्याचा भाजपच्या प्रयत्नांना मोठी खीळ बसली आहे. शिवसेना हा संपूर्ण पक्ष भावनेवर चालणारा असल्याने उद्धव ठाकरे यांच्या या एका कृतीने ठाकरे परिवार बाबतची भावना पूर्ववत होण्यात शिवसेनेला मदत झाली आहे. याची भाजप वर्तुळालाही चिंता लागली आहे.
गौप्यस्फोटाने करमणूक
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये फूट पडावी यासाठी भाजपकडून वेगवेगळय़ा नेत्यांकडून संभ्रमात टाकणारी वक्तव्ये केली जातात. असाच एक प्रयोग मुंबईतील नेते आशिष शेलार यांनी करून पाहिला. 2017 साली राष्ट्रवादीला भाजप सोबत सत्तेत घेऊन तीन पक्षांचे सरकार करण्याची चाचपणी झाली होती. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर सत्तेत यायला तयार नसल्याने तेव्हा ती होऊ शकली नाही असा गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केला. सुधीर मुनगंटीवार यांनी तर, तेव्हा संधी दवडली ही चूक झाली. असे बॅक फायरही दिले. पण काँग्रेसमध्ये चलबिचल झाली नाही की शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये! कोणीच या गौप्यस्फोटाला फारसे गांभीर्याने न घेता, आता ते जुने झाले… म्हणत उडवून लावले. या वक्तव्याचे हसे झाले हे मात्र निश्चित.
शिवराज काटकर








