कचऱ्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष : नागरिकांतून नाराजी
बेळगाव : शहरालगतच्या ग्राम पंचायत हद्दीतील कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. त्यामुळे या कचऱ्याची उचल करण्याची वेळ मनपावर येत असून मुख्य रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींनी आपापल्या हद्दीतील कचऱ्याची समस्या मार्गी लावावी, यासाठी 28 मार्च रोजी महापालिकेत बैठक घेऊन सूचना करण्यात आली होती. तरीदेखील काही ग्राम पंचायतींच्या हद्दीत कचऱ्याची समस्या जैसे थे आहे. मुख्य रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने कचरा समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने संबंधित ग्राम पंचायतींना दोन आठवड्यांची मुदत दिली होती. या मुदतीत समस्या न सुटल्यास कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासह त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आली होती. या सूचनेनंतर शहरालगतच्या काही ग्राम पंचायतींनी मुख्य रस्त्यावरील ब्लॅकस्पॉट हटविले होते. पण काही ग्राम पंचायतींनी मात्र याकडे अद्यापही दुर्लक्ष केले आहे.
बैठकीला ग्राम पंचायत अध्यक्षांनाही बोलावणार
बेळगाव शहरालगत असलेल्या 11 ग्राम पंचायती व दोन नगरपंचायतींच्या हद्दीत कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. ग्राम पंचायती व नगरपंचायतींच्या रहिवाशांकडून महापालिकेच्या हद्दीत कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ब्लॅकस्पाट तयार झाले आहेत. 28 मार्च रोजी झालेल्या बैठकीला पीडीओ व सेक्रेटरी उपस्थित होते. पुढील बैठकीला ग्राम पंचायत अध्यक्षांना देखील बोलावण्याची मागणी करण्यात आली होती.
रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने समस्या
कचऱ्याची उचल व विल्हेवाट लावण्यासंदर्भात काही ग्राम पंचायती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. सांबरा, हिंडलगा, बेनकनहळ्ळी, गणेशपूर, मच्छे, पिरनवाडी, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक आदी ग्राम पंचायतींच्या हद्दीत मुख्य रस्त्यावरच कचरा टाकण्याचे प्रमाण अद्यापही कमी झाले नाहीत.









