टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो-परिसरातील ब्लॅकस्पॉट हटविले : कचऱ्याचे ढीग हटवून काढली रांगोळी
बेळगाव : महापालिकेच्यावतीने शहरातील ब्लॅकस्पॉट निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याला यशही येत आहे. महापालिकेच्या या कामाला जनताही उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहे. शुक्रवारी व्हॅक्सिन डेपो रस्त्यावरील झाडांजवळ अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून होते. ते कचऱ्याचे ढीग हटवून त्या ठिकाणी रांगोळी घालून रोपट्यांची कुंडे ठेवण्यात आली आहेत. यावेळी नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. व्हॅक्सिन डेपोजवळील पोस्ट कार्यालयाशेजारी पदपथावरच कचऱ्याचा ढीग होता. जनता त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात कचरा आणून फेकत होते. बऱ्याचवेळा कचऱ्याला काहीजण आग लावत होते. त्यामुळे झाडांच्या बुंध्यांनाही धोका निर्माण झाला होता. याची दखल महापालिकेने घेऊन आता झाडांना चुना लावला. त्यानंतर त्या परिसरात रांगोळी टाकून कुंड्या देखील ठेवण्यात आल्या आहेत.
यावेळी या परिसरातील नागरिकांनी झाडाची पूजा केली. महिलांनी देखील पूजा करून रांगोळी घातली. त्यावेळी नगरसेवक आनंद चव्हाण यांच्यासह नागरिकांनीही पुढाकार घेतला होता. महापालिकेच्या या कार्याबद्दल साऱ्यांनीच समाधान व्यक्त केले. याचबरोबर महर्षी रोड, नेहरु रोड कॉर्नरच्या ठिकाणीही मोठ्याप्रमाणात कचरा टाकण्यात येत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबत मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी, निरीक्षक कलावती अदमनी हे स्वत: उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना ब्लॅकस्पॉट दूर करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी या परिसरातील संजय पाटील, विष्णू पाटील, अशोक माने, मदन देशपांडे, गोविंद गिंडे व नागरिक उपस्थित होते.









