‘तरुण भारत’ वृत्ताची दखल, नागरिकांतून समाधान
बेळगाव : होसूर येथील तांबिट गल्ली कॉर्नरवर परिसरातील रहिवाशी मोठ्या प्रमाणात कचरा टाकत होते. त्यामुळे त्याठिकाणी ब्लॅक स्पॉट तयार झाला होता. याचा नाहक त्रास तेथील रहिवासी व नागरिकांना सहन करावा लागत असल्याने याबाबत ‘तरुण भारत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. यामुळे महानगरपालिकेकडून तेथील ब्लॅक स्पॉट हटविण्यात आला आहे. त्याबरोबर कचरा टाकण्यात येऊ नये, टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा अशयाचा सूचनाफलकही बसविण्यात आला आहे. तांबिट गल्ली कॉर्नरवर गेल्या काही दिवसापासून मोठ्याप्रमाणात कचरा टाकण्यात येत होता. त्या ठिकाणी कचराकुंडी किंवा भूमिगत डस्टबीनदेखील नाही. मात्र काहीजण गाडीवरून जाता-जाता कचरा त्याठिकाणी फेकून देत होते. टाकण्यात आलेल्या कचऱ्याची देखील वेळेत उचल होत नसल्याने त्याठिकाणी मिनी कचरा डेपोच निर्माण झाला होता.
नागरिकांना अनेकवेळा सूचना करूनदेखील कचरा टाकण्याचे प्रमाण मात्र कमी झाले नाही. कचऱ्यावर मोकाट कुत्र्यांचा वावरदेखील वाढला होता. तेथील रहिवाशांनी याबाबत अनेकवेळा महापालिकेकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आले होते. याबाबत ‘तरुण भारत’ने आवाज उठविताच खडबडून जागे झालेल्या महापालिकेने शुक्रवारी तेथील ब्लॅक स्पॉट दूर केला आहे. कचऱ्याची उचल करण्यासह निर्माण झालेली दलदल लहान जेसीबीच्या सहाय्याने दूर करण्यात आली आहे. कचरा टाकू नये, कचरा टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा सूचना फलक लावण्यासह नागरिकांना सूचना केली आहे. यासाठी नगरसेवक गिरीश धोंगडी, राजू भातकांडे आणि जयंत जाधव यांनी परिश्रम घेतले. लवकरच त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेदेखल बसविले जाणार आहेत. अनेक वर्षापासूनचा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.









