नॅशनल ग्रीड झाले फेल ः काळोखात बुडाली शहरे
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
महागाई आणि आर्थिक संकटाला तोंड देणाऱया पाकिस्तानसमोर आता वीज संकट उभे ठाकले आहे. शेजारी देशात सोमवारी मोठा पॉवर कट झाला आहे. इस्लामाबाद, लाहोर आणि कराची यासारखी शहरे काळोखात बुडाली होती. नॅशनल ग्रीड सोमवारी सकाळी 7.34 वाजल्यापासून डाउन झाल्याने पॉवर सिस्टीम बंद पडली. सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी वेगाने काम केले जात असल्याचे पाकिस्तान ऊर्जा मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
पाकिस्तानात हिवाळय़ादरम्यान वीज वाचविण्यासाठी ऊर्जानिर्मिती केंद्रांना बंद ठेवण्यात येते. सोमवारी सकाळी सिस्टीम ऑन करण्यात आल्यावर उत्तर पूर्ण यंत्रणा बंड पडली. पॉवर ग्रीड पूर्वपदावर आणण्यासाठी किमान 12 तासांचा कालावधी लागणार असल्याचे ऊर्जामंत्री खुर्रम दस्तगीर यांनी सांगितले आहे.

पेशावर आणि इस्लामाबादमध्ये वीज यंत्रणा पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पूर्ण पाकिस्तानात 117 पॉवर ग्रिड्सना होणारा वीजपुरवठा ठप्प झाल्याची माहिती एका अधिकाऱयाने दिली आहे. बलुचिस्तानच्या 22 शहरांमधील वीजपुरवठा सोमवारी ठप्प झाला होता असे क्वेटा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीने सांगितले आहे.
पाकिस्तानात मागील 4 महिन्यांमध्ये पूर्ण देशाचा पॉवर ग्रीड ठप्प होण्याची ही दुसरी वेळ आहे. पाकिस्तानच्या सरकारने चालू वर्षी नवी ऊर्जा योजना तयार केली आहे, परंतु ती मान्य करण्यास लोकांनी नकार दिला होता. या योजनेला विरोध करणाऱयांमध्ये व्यावसायिकांचे प्रमाण अधिक आहे.









